pankaja munde

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या ७२च्या जयंतीदिनी भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे कुटुंबासह परळी येथील गोपीनाथ गडावर दाखल झाल्या. वडील गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन केले.

मुंबई : भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे(gopinath munde) यांच्या ७२च्या जयंतीदिनी भाजप नेत्या पंकजा मुंडे(pankaja munde) आणि खासदार प्रीतम मुंडे कुटुंबासह परळी येथील गोपीनाथ गडावर(gopinath gad) दाखल झाल्या. वडील गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन केले. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर गोपीनाथ गडावर यावर्षी सभा रद्द करण्याचा निर्णय पंकजा मुंडे यांनी घेतला.गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती निमितेताने गोपीनाथ गडावर आज भजनाचा देखील कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात पंकजा मुंडे सहभागी झाल्या. हातात टाळ घेऊन पंकजा यादेखील भजनात तल्लीन झाल्या.

कोरोना रुग्णांना राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे गोपीनाथ गडावर आज रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले. विशेष म्हणजे पंकजा मुंडे यांनी रक्तदान करुन शिबिराचा शुभारंभ केला.

पंकजा मुंडे यांनी यावेळी बोलताना वडिलांची अजूनही प्रचंड आठवण येत असल्याची भावनिक प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या की, “गोपीनाथ मुंडे यांच्या ७२ व्या जयंती निमित्ताने खरे सांगायचे तर मुंडे साहेबांची जयंती हा शब्दच मला खटकतो. त्यांचा वाढदिवस साजरा करण्याची सवय आम्हाला २०१४ पर्यंत होती. आता त्याला जयंती हा शब्द लावावा लागतो. हे अनेकांच्या मनातील शल्य आहे. साहेबांना जाऊन सहा वर्ष झाले तरी पोकळी कायम आहे. त्यांचे नेतृत्व खरच कमाल होते”, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

पंकजा मुंडे म्हणाल्या की,“त्यांनी सत्तेत असताना किंवा नसताना कधीच माझा वाढदिवस मोठा करा असे सांगितले नाही. कार्यकर्ते आपापल्या मनाने करत होते. साहेबांनी तो वेळ परिवारासोबत घालवला. कधीच त्याचा बाऊ केला नाही. आम्ही देखील आमचे वाढदिवसाच साजरी करत नाहीत. पण कार्यकर्तांचा फार आग्रह असतो. साहेब गेल्यानंतर गोपीनाथ गडाची निर्मिती झाल्यापासून गोपीनाथ गड हे स्थान झाले आहे, जिथून लोक ऊर्जा घेऊन जातात. आज त्यांची खूप आठवण येते”, अशी प्रतिक्रिया पंकजा यांनी दिली.

गडावर दिग्गजांची उपस्थिती 
गोपीनाथ मुंडे जयंती निमित्ताने पंकजा मुंडे यांच्यासह खासदार प्रीतम मुंडे, खासदार सुजय विखे पाटील, रासप नेते महादेव जानकर, खासदार डॉ. भागवत कराड, आमदार श्वेता महाले, आमदार रत्नाकर गुट्टे, भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, भाजप नेते अक्षय मुंदळा, डॉ. शिलिनी कराड या दिग्गज नेत्यांनी गोपीनाथ गडावरक जावून गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन केले. याशिवाय गोपीनाथ गडावर सकाळपासून कार्यकर्त्यांची ये-जा सुरु आहे. सकाळपासून शेकडो मुंडे समर्थक, कार्यकर्ते गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन करण्यासाठी गोपीनाथ गडावर उपस्थित होते.