सरासरीच्या 25% आगाऊ रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात द्या; पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकाऱ्यांचे पीक विमा कंपनीला निर्देश

सरासरीच्या 50% पेक्षा अधिक नुकसान झालेल्या विमा धारक शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत संभाव्य नुकसानीच्या सरासरीच्या 25% अग्रीम (आगाऊ) रक्कम तातडीने त्यांच्या खात्यात देण्यात यावी असे निर्देश बीड चे जिल्हाधिकारी राधाबीनोद शर्मा यांनी भारतीय पीक विमा कंपनीला दिले आहेत. दरम्यान जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी खरीप पिकांच्या आढावा तसेच जिल्हा नियोजनाच्या बैठकीत, याबाबत जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले होते. या आदेशानुसार जिल्ह्यातील पाटोदा, आष्टी, गेवराई, परळी, केज, शिरूर कासार, वडवणी, धारूर या तालुक्यातील सर्वेक्षण झालेल्या सर्व महसुली मंडळातील सर्व विमाधारक शेतकऱ्यांना ही अग्रीम (आगाऊ) रक्कम मिळणार आहे.

    बीड : बीड जिल्ह्यात जुलै महिन्यात सोयाबीन, उडीद, मूग आदी पिकांच्या ऐन वाढीच्या काळात पावसाने 25-30 दिवसांची उघडीप घेतल्याने अनेक महसुली मंडळात शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. या सर्व ठिकाणच्या सरासरीच्या 50% पेक्षा अधिक नुकसान झालेल्या विमा धारक शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत संभाव्य नुकसानीच्या सरासरीच्या 25% अग्रीम (आगाऊ) रक्कम तातडीने त्यांच्या खात्यात देण्यात यावी असे निर्देश बीड चे जिल्हाधिकारी राधाबीनोद शर्मा यांनी भारतीय पीक विमा कंपनीला दिले आहेत.

    दरम्यान जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी खरीप पिकांच्या आढावा तसेच जिल्हा नियोजनाच्या बैठकीत, याबाबत जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले होते. या आदेशानुसार जिल्ह्यातील पाटोदा, आष्टी, गेवराई, परळी, केज, शिरूर कासार, वडवणी, धारूर या तालुक्यातील सर्वेक्षण झालेल्या सर्व महसुली मंडळातील सर्व विमाधारक शेतकऱ्यांना ही अग्रीम (आगाऊ) रक्कम मिळणार असून, अंबाजोगाई व माजलगाव तालुक्यात मुख्यत्वे सोयाबीन पिकाचे फेर सर्वेक्षण करून त्या दोन तालुक्यांची स्वतंत्र अधिसूचना निर्गमित करण्यात येणार आहे.

    बीड जिल्ह्यात 2 लाख हेक्टर पेक्षा अधिक सोयाबीनचे क्षेत्र आहे. त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांच्या या निर्णयामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा लाभ मिळणार आहे. 2019 मध्ये कोणत्याही पीक विमा कंपनीने बीड जिल्ह्यात निविदा प्रक्रियेत भाग न घेतल्यामुळे बीड जिल्हा पीक विम्यापासून वंचित राहिला होता, मात्र धनंजय मुंडे यांनी खरीप हंगाम 2020 मध्ये राज्य व केंद्र स्तरावर सतत पाठपुरावा करून बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भारतीय पीक विमा कंपनी मिळवून दिली होती. शेतकऱ्यांच्या हितासाठी आमचे सरकार नेहमीच कटिबद्ध असून, बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पावसाने महिनाभर उघडीप घेतल्याने होणाऱ्या नुकसानीत दिलासा देण्याचा आमचा हा प्रयत्न असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

    खरीप हंगाम आढावा बैठक तसेच जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत बीड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आमदार प्रकाश दादा सोळंके, आमदार संदीप भैया शिरसागर, आमदार बाळासाहेब आजबे काका, तसेच आमदार संजय दौड व इतर सर्वच लोकप्रतिनिधींनी याबाबत आग्रही मागणी केली होती.