बीड जिल्ह्यात रेमडेसिवीरचा सर्रास काळाबाजार; रेमडेसिवीरमध्ये सलाईनचे पाणी टाकून विक्री

    बीड : बीड जिल्ह्यात रेमडीसिविर इंजेक्शनचा सर्रास काळाबाजार सुरू असल्याचं समोर आलंय. मागील आठवड्यात शिवाजीनगर पोलिसांनी तीन आरोपींना रंगेहात रेमडीसिविर विकताना पकडल होतं. आता यामध्ये एक धक्कादायक बाब समोर आलीय, ती म्हणजे रेमडीसिविरच्या बाटल्यात सलाईनचे पाणी टाकून विकले गेलंय, हा प्रकार समोर आल्यानं एकच खळबळ उडाली आहे.

    राज्यात रेवडीसिविर इंजेक्शनचा तुटवडा आहे. परिणामी या इंजेक्शनचा सर्रास काळा बाजार सुरु असल्याचं समोर आलं. असं असताना तुम्ही घेतलेलं इंजेक्शन हे ओरिजनल आहे का.? हे नक्की तपासून पहा, कारण बीडमध्ये रेमडीसिविर इंजेक्शनच्या नावाखाली एका व्यक्तीला बनावट इंजेक्शन देण्यात आलं. याच दरम्यान शिवाजीनगर पोलिसांनी दोघा जणांना रंगेहात पकडल, या प्रकरणात अधिक तपासाअंती धक्कादायक बाब समोर आली. ती म्हणजे यातील एक आरोपी कंपाउंडर असून त्याने रुग्णालयातील इंजेक्शनच्या बाटल्यात सलाईनचे पाणी टाकून हे इंजेक्शन 22 हजारांना विकण्याचा प्रयत्न केला. अशी माहिती पोलीस निरीक्षक साईनाथ ठोंबरे यांनी दिली.

    दरम्यान काळ्याबाजारात एका इंजेक्शनची किंमत जवळपास 30 ते 40 हजार रुपयांपर्यंत आहे. माञ हे इंजेक्शन मिळवण्यासाठी देखील रुग्णांच्या नातेवाईकांना मोठे प्रयत्न करावे लागतात. एकीकडे जिल्हा प्रशासनाकडून रेमडीसिविरसाठी रुग्णांच्या नातेवाईकांना नोंदणी करण्याचे आवाहन केलं जातंय. परंतु नोंदणी केल्यानंतर जवळपास सहा दिवसानंतर देखील इंजेक्शन हाती मिळत नाही. त्यामुळेच काळाबाजारातून इंजेक्शन विकत घेण्याची वेळ नातेवाईकांवर येते. परंतु या प्रकारानंतर काळ्या बाजारातील इंजेक्शन देखील ओरिजनल मिळण्याची शाश्वती राहिली नाही. अशी प्रतिक्रीया रुग्णांच्या नातेवाईकांनी दिली आहे.