मराठा समाजाला आरक्षण देऊन अशोक चव्हाण यांचा राजीनामा घ्या, अन्यथा…

शिवसंग्रामचे नेते व आमदार विनायक मेटे यांनी आज बीडमध्ये ठाकरे सरकारला इशारा दिला आहे. विनायक मेटे यांनी ठाकरे सरकारला 1 महिन्याचा अल्टिमेटम देत मराठा समाजाला आरक्षण द्या आणि मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांचा राजीनामा घ्या, अन्यथा 7 जुलैला होणारं पावसाळी अधिवेशन चालू देणार नाही, असा इशारा दिला आहे.

    बीड : सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर ठाकरे सरकारच्या अडचणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. मराठा समाज महाराष्ट्र सरकारच्या विरोधात पेटून उठल्याचे दिसून येत आहे त्यातच छत्रपती संभाजीराजे यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर आणि आक्रमक भूमिका घेतल्यानंतर शिवसंग्रामचे नेते व आमदार विनायक मेटे यांनी आज बीडमध्ये ठाकरे सरकारला इशारा दिला आहे. विनायक मेटे यांनी ठाकरे सरकारला 1 महिन्याचा अल्टिमेटम देत मराठा समाजाला आरक्षण द्या आणि मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांचा राजीनामा घ्या, अन्यथा 7 जुलैला होणारं पावसाळी अधिवेशन चालू देणार नाही, असा इशारा दिला आहे.

    बीडमध्ये आज विनायक मेटे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासंदर्भातील निषेध मोर्चा काढण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान, बीडमध्ये बोलत असताना आमदार विनायक मेटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अशोक चव्हाणांवर गंभीर टीका केली आहे.

    अशोक चव्हाण यांच्यासारखा नाकर्ता माणूस आतापर्यंत झाला नाही, असं म्हणत अशोक चव्हाण यांच्या मूर्खपणामुळे तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या दुर्लक्षामुळेच मराठा आरक्षण रद्द झालं, अशी खरमरीत टीका मेटे यांनी केली.

    दरम्यान मराठा आरक्षणावरून सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात चांगलंच रण पेटल्याचं दिसून येत आहे. आमदार विनायक मेटे यांनी सरकारवर टीका करताना म्हटलं की, मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर केंद्राने तीन दिवसात पुनर्विचार याचिका दाखल केली पण राज्य सरकारने अजूनही कोणती ठोस पावले उचललेली नाहीत. त्याबरोबरच मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत ही लढाई सुरूच राहणार असल्याचं त्यांनी बोलून दाखवलं.