शिवसेना उपजिल्हाप्रमुख हल्ला प्रकरण; राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या तालुकाध्यक्षासह पाच जणांवर गुन्हा दाखल

शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख हनुमंत जगताप यांच्यावर प्राणघातक हल्ला करुन त्यांना पुलावरुन फेेकण्याचा प्रयत्न झाल्याची खळबळजनक घटना ३० ऑगस्ट रोजी घडली होती. याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरुन ९ जणांवर गुन्हा नोंद झाला. उपजिल्हाप्रमुख जगताप यांच्या फिर्यादीवरुन राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष तथा कुटेवाडी येथील उपसरपंच नंदू कुटेसह पाच जणांवर गुन्हा नोंद झाला.

    बीड : शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख हनुमंत जगताप यांच्यावर प्राणघातक हल्ला करुन त्यांना पुलावरुन फेेकण्याचा प्रयत्न झाल्याची खळबळजनक घटना ३० ऑगस्ट रोजी घडली होती. याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरुन ९ जणांवर गुन्हा नोंद झाला. उपजिल्हाप्रमुख जगताप यांच्या फिर्यादीवरुन राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष तथा कुटेवाडी येथील उपसरपंच नंदू कुटेसह पाच जणांवर गुन्हा नोंद झाला. तर दुसऱ्या गटानेही तक्रार दिली. त्यावरुन जगताप यांच्यासह चौघांवर फिर्याद नोंदवली गेली.

    शिवसेना उपजिल्हाप्रमुख हनुमंत जगताप यांचे बंधू व दोन पुतणे यांच्यावर नुकतीच हद्दपारीची कारवाई झाली. २६ ऑगस्ट रोजी कारवाईसाठी गेलेल्या पिंपळनेर पोलिसांची जीप गावकऱ्यांनी रोखून धरली होती. दरम्यान, २८ ऑगस्ट रोजी मंत्री संदीपान भुमरे यांच्या उपस्थितीत बीडमध्ये बैठक पार पडली. यात उपजिल्हाप्रमुख जगताप यांनी आपल्यावर झालेल्या अन्यायाचा पाढा वाचून राष्ट्रवादी काँग्रेससह शिवसेना जिल्हाप्रमुखावर आरोप केला होता.अशातच ३० ऑगस्ट रोजी त्यांच्यावर हल्ला झाला. . दरम्यान, यानंतर दुपारी १२ वाजता जरुड- भवानवाडी रस्त्यावर हनुमंत मनोहर जगताप, उर्मिला हनुमंत जगताप, प्रताप हरिदास जगताप, काशिनाथ तुळशीदास जगताप यांनी दगडाने मारहाण करुन शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली, अशी तक्रार राजेभाऊ नारायण शिंदे (रा. भवानवाडी) यांनी पिंपळनेर ठाण्यात दिली. त्यावरुन गुन्हा नोंद झाला.

    दरम्यान, हनुमंत जगताप यांच्यावर खासगी दवाखान्यात उपचार सुरु असून ३१ ऑगस्ट रोजी पिंपळनेर पोलिसांनी जवाब नोंदविला. त्यानुसार अमोल शिवाजी शिंदे, राजेंद्र नारायण शिंदे, योगेश मच्छिंद्र शिंदे, नितीन शिवा जाधव (सर्व रा. भवानवाडी) व रायुकॉ तालुकाध्यक्ष नंदू अंकुश कुटे (रा. कुटेवाडी ता.बीड) व अनोळखी पाच यांच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंद झाला. शिवीगाळ करत मारहाण केली तसेच पुलावरुन फेकण्याचा प्रयत्न केला. गळ्यातील सोनसाखळी, ब्रासलेट व पाच अंगठ्या असा एकूण तीन लाख ५० हजार रुपयांचा ऐवज हिसकावून नेला.

    धुमसत होता राजकीय वाद

    शिवसेनेचे जगताप व राष्ट्रवादी काँग्रेसचे कुटे यांच्यात गेल्या काही वर्षांपासून राजकीय वाद धुमसत होता. यापूर्वीही त्यांच्यात टोकाचे वाद झालेले आहेत. पुन्हा एकदा हल्ला, परस्परविरोधी तक्रारींमुळे ते चर्चेत आले आहेत.दरम्यान, दोन्ही गटाचे लोक फरार असून तपास सुरु असल्याचे पिंपळनेर ठाण्याचे सहायक निरीक्षक बाळासाहेब आघाव यांनी सांगितले.