आलिशान कारने दुचाकीस्वरास चिरडले, संबंधितांवर गुन्हा दाखल करा; परळी ग्रामीण पोलीस ठाण्यासमोर नातेवाईकांचा ठिय्या

परळी शहरापासून काही अंतरावर असलेल्या तळेगाव परिसरात, किंगमेकर नाव असणाऱ्या अलिशान कारने, दुचाकीस्वारास चिरडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. यामध्ये दुचाकीस्वार प्रमोद भगवान तांदळे या युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात अतिशय भीषण स्वरूपाचा असल्याचे घटनास्थळी असलेल्या गावककऱ्यांनी म्हटले आहे.

    बीड : परळी शहरापासून काही अंतरावर असलेल्या तळेगाव परिसरात, किंगमेकर नाव असणाऱ्या अलिशान कारने, दुचाकीस्वारास चिरडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. यामध्ये दुचाकीस्वार प्रमोद भगवान तांदळे या युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात अतिशय भीषण स्वरूपाचा असल्याचे घटनास्थळी असलेल्या गावककऱ्यांनी म्हटले आहे. या दुचाकीला धडक दिलेली आलिशान कार ही परळी नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्ष तथा नगर सेवक च्या मुलाची असल्याची चर्चा शहरात आहे.

    दरम्यान काही दिवसापूर्वीच या पोराचा वाढदिवस झाला या पोराच्या वाढदिवसानिमित्त, बापाने लाखो रुपयांची ही आलिशान कार घेऊन दिली होती. आणि तीच कार दारू पिऊन चालवणाऱ्या पोराने, एका निष्पाप युवकाचा जीव घेतला, असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे. यामुळे या कारचालकावर तात्काळ गुन्हा दाखल करुन, आम्हाला न्याय देण्यात यावा. ही मागणी घेऊन परळीच्या ग्रामीण पोलीस ठाण्यासमोर, मयत प्रमोद तांदळे यांच्या नातेवाईकांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

    दरम्यान मयत प्रमोद तांदळे हा त्याच्या आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता घराचा आधार होता. त्याच्या अशा अचानक जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. परळी पोलीस त्या राजकीय व्यक्तीच्या मुलावर गुन्हा दाखल करणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.