वीजेची मागणी कमी झाल्यामुळे परळीतील औष्णिक विद्युत केंद्रातील तीन संच बंद…

लाँकडाऊन व विजेची मागणी कमी झाल्याने ६ मे पासून औष्णिक विद्युत महानिर्मिती केंद्राचे सर्वसंच बंद असल्याने मोठी बेरोजगारी निर्माण झाली आहे.

    परळी : परळी येथे औष्णिक विद्युत महानिर्मितीच्या तीन संचातून ७५० मेगावँट विज निर्मिती केली जाते. या महानिर्मिती केंद्रामुळे शहर व परिसरातील अनेक नागरिकांना छोटा मोठा रोजगार मिळतो. मात्र लाँकडाऊन व विजेची मागणी कमी झाल्याने ६ मे पासून औष्णिक विद्युत महानिर्मिती केंद्राचे सर्वसंच बंद असल्याने मोठी बेरोजगारी निर्माण झाली आहे.

    दरम्यान शहरात महाऔष्णिक विद्युत केंद्र आहे. सुरुवातीला या महानिर्मिती केंद्रातून ११०० मेगावँट विजनिर्मिती केली जात होती. यातील दोन विद्युत निर्मिती संचाची मुदत संपल्याने ते भंगारात काढण्यात आले आहेत. उर्वरित तीन संच हे २५० मेगावँट चे असल्याने या तीन संचातून ७५० मेगावँट विद्युत निर्मिती केली जाते. या संचाना सुरुवातीपासूनच ग्रहण लागले आहे. येथील औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रास कधी पाणी कमी पडते. कधी, कोळसा नसतो. दोन्ही उपलब्ध असेल तर या संचातून निर्माण होणारी विज महाग पडते म्हणून विद्युत निर्मिती बंद केली जाते. सध्या लाँकडाऊनमुळे विजेची मागणी कमी झाल्याने ६ मे पासून येथील औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रातील तीनही संच सध्या बंद आहेत. महाराष्ट्रातील इतर ठिकाणचे सर्व संच सुरू आहेत. येथील संचच का बंद असा प्रश्न बेरोजगार युवक करत आहेत.

    अगोदर कोरोना मुळे संपूर्ण आर्थिक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. रोजगाराची साधने बंद झाली आहेत. येथे सर्वात जास्त रोजगार उपलब्ध करून देणारा हा एकमेव प्रोजेक्ट आहे. तोही बंल पडल्याने बेरोजगारावर कुऱ्याड कोसळी आहे. काही करुन हे संच कसे सुरू होतील याकडे संबंधीतानी लक्ष देणे गरजेचे आहे. येथील विद्युत निर्मिती संच सातत्याने बंद करावे लागत असल्याने यावर अवलंबून असलेले सुशिक्षित बेरोजगार, काँनट्रँक्टर यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. या तिन्ही संचाच्या ठिकाणी काम करणारे जवळपास १ हजारच्या वर कामगार आज बेरोजगार झाले आहेत. ६ मे पासून बंद केलेले संच अद्यापही बंदच आहेत. आज दि.26 मे रोजी औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, वीजेची मागणी कमी झाल्यामुळे संच बंद आहेत.