राजकारण कराल, तर धडा शिकवू ; विनायक मेटेंचा सरकारला इशारा

मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात (Maratha Reservation) आगीत हात घालण्याचा प्रयत्न ठाकरे सरकारमधील अनेक नेते करत आहेत. पण लक्षात ठेवा मराठा आरक्षण प्रश्नावर असले घाणेरडे राजकारण कराल, तर एक दिवस हाच मराठा समाज तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. मराठा समाजातील तरुण देशोधडीला लागले आहेत.

बीड : मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात (Maratha Reservation) आगीत हात घालण्याचा प्रयत्न ठाकरे सरकारमधील अनेक नेते करत आहेत. पण लक्षात ठेवा मराठा आरक्षण प्रश्नावर असले घाणेरडे राजकारण कराल, तर एक दिवस हाच मराठा समाज तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. मराठा समाजातील तरुण देशोधडीला लागले आहेत. आरक्षण देण्यासाठी या ठाकरे सरकारची सकारात्मक भूमिका आतापर्यंत कधीच दिसलेली नाही. मात्र आता खूप झाले, आता सहन करणार नाही, असे शिवसंग्रामचे संस्थापक आमदार विनायक मेटे (Vinayak Mete) यांनी स्पष्ट केले.

१७ नोव्हेंबरपर्यंत आरक्षण मिळालेच पाहिजे

विनायक मेटे गुरुवारी आयोजित मराठा आरक्षण व युवा परिषद कार्यक्रमात बोलत होते. यावेळी मेटे यांनी मराठा समाजाला जर 17 नोव्हेंबरपर्यंत आरक्षण मिळाले नाही तर आम्ही न्यायालयात जाऊ, असा इशारा मेटे यांनी दिला. मराठा समाजाला तत्काळ आरक्षण द्यावे. तत्पूर्वी राज्यात होत असलेल्या नोकर भरती प्रक्रियेत मराठा समाजाला न्याय मिळावा, यासाठी शिवसंग्राम सात नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी मशाल मार्च काढणार आहे, अशी माहितीही यावेळी मेटे यांनी दिली.

ठाकरे सरकारनेच केले दुर्लक्ष

पुढे बोलताना आमदार मेटे म्हणाले, मी यापूर्वी अनेकवेळा बैठकीमध्ये सांगत होतो की, हे आरक्षण देत आहात पण चुकीच्या पद्धतीने देतायेत. मात्र पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारने तेव्हा माझे ऐकले नाही. त्यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आल्यानंतर कायद्यात बदल करून घेतले नंतर हायकोर्टात केस जिंकली. हे सगळं झाल्यानंतर मात्र काही लोकांच्या पोटात पोटशूळ उठला व नंतर ठाकरे सरकार आल्यानंतर मराठा आरक्षणाच्या विषयाला अंतरिम स्थगिती आली. व त्यानंतर पुन्हा कोविड च्या नावाखाली या सरकारने मराठा आरक्षणाच्या प्रश्नाकडे साफ दुर्लक्ष केले आहे. हा माझा स्पष्ट आणि जाहीर आरोप असल्याचे आमदार मेटे म्हणाले.