प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

चार वर्षांपासून अड्याळ पोलिस स्टेशन हद्दीतील गावात कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची निवासस्थाने आजही बिकट स्थितीत आहेत.

    पवनी (Pawani).  चार वर्षांपासून अड्याळ पोलिस स्टेशन हद्दीतील गावात कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची निवासस्थाने आजही बिकट स्थितीत आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांचे कक्ष हायफाय अन्‌ कर्मचाऱ्यांच्या घरांवर ताडपत्री अशी म्हणण्याची वेळ आली आहे.

    अड्याळ पोलिस स्टेशनअंतर्गत 79 गावांचा कारभार सांभाळला जातो. या ठिकाणी फक्त तीन अधिकारी व तीस पोलिस कर्मचारी आहे. त्यातही साप्ताहिक रजेवर तथा किरकोळ रजेवर जाणाऱ्या पोलिस कर्मचारी यांची संख्या ही जास्तीत जास्त मग उरलेल्या पोलिस कर्मचारी यांनी 79 गावांतील काम कसे आणि कोणत्या प्रकारे हाताळायचे हा बिकट प्रश्न आहे.

    ज्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या भरवशावर हा पोलिस ठाण्याचा कारभार चालतो. त्यांच्या घरावरील छतावर आजही मोठमोठ्या प्लास्टिक ताडपत्री घातल्या दिसतात. अधिकारी कक्षेची मात्र सरबराई सुरू झाली आहे. पोलिस ठाण्यात 33 पैकी फक्त बारा पोलिस कर्मचारी व एक अधिकारी मिळून 13 पोलिस स्टेशनच्या जागेत राहतात. बाकीचे दोन अधिकारी व 19 पोलिस कर्मचारी किरायच्या खोलीत गावातील ठिकठिकाणच्या किरायाच्या घरात वास्तव्यास असतात.

    जे पोलिस कर्मचारी मागील अनेक वर्षांपासून पोलिस स्टेशनच्या क्वॉर्टरमध्ये राहतात तेथील सिमेंट पत्रे तुटले असल्याने छतावरून पाणी गळू नये म्हणून अनेक पोलिस कर्मचाऱ्यांनी आपल्या छतावर ताडपत्री घालून ठेवली आहे. पण असे किती दिवस चालणार हाही प्रश्न आहे. विविध प्रकरण व त्यांच्या शोधात जाणारा वेळ, त्यांचा तपास, शोध इत्यादी कामाने येथील पोलीस कर्मचारी तथा अधिकारी वैतागून जातात. त्यामुळे राहण्याची व्यवस्था सुस्थितीत असावी, अशी पोलिसांची मागणी आहे.