अधिकाऱ्यांची गावात लसीकरणासाठी जनजागृती

कोविड चाचणीदरम्यान तालुक्यात नियमित मोठया प्रमाणात कोरोना बाधित रुग्ण आढळून येत असताना नागरिकांकडून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाकडे दुर्लक्ष केले जात आहे.

    लाखांदूर (Lakhandur).  कोविड चाचणीदरम्यान तालुक्यात नियमित मोठया प्रमाणात कोरोना बाधित रुग्ण आढळून येत असताना नागरिकांकडून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाकडे दुर्लक्ष केले जात आहे. सदर परिस्थितीत नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन करीत खुद्द तालुका अधिकाऱ्यांनी गावागावात भोंगा वाजवून जनजागृती चालविली आहे.

    शासनाच्या आरोग्य विभागांतर्गत मागील काही महिन्यापासून तालुक्यात 45 वर्षे वयोगटावरील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण केले जात आहे. मात्र लसीकरण संबंधाने विविध अफवांना बळी पडून हेतुपुरस्पर नागरिकांकडून लसीकरणाकडे दुर्लक्ष केले जात आहे. या परिस्थितीत तालुक्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणअभावी कोरोना बाधित रुग्ण संख्येत वाढ दिसून येत आहे. दरम्यान या रुग्ण संख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य विभागांतर्गत तालुक्यातील सर्वच गावात लसीकरणासाठी जनजागृती केली जात आहे.

    लाखांदूरचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नलिनीकांत मेश्राम यांनी नागरिकांच्या लसीकरणासाठी खुद्द तालुक्यातील काही गावात जाऊन भोंगा वाजवून जनजागृती चालविली आहे. दरम्यान तालुक्यात गत काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्ण संख्येत दिसून येणारी वाढ कमी करण्यासाठी तालुक्यातील 45 वर्ष वयोगटातील सर्वच नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले जात आहे.