अपुऱ्या बांबू पुरवठ्यामुळे बुरड व्यवसाय संकटात; बांबूसाठी भटकंती

दिवसभर कष्ट करून बुरड कामगार बांबूपासून विविध वस्तू तयार करतात. जगावर कोरोनाचे संकट असल्याने बुरड व्यवसायिक संकटात सापडले आहेत. त्यातच तालुक्यातील बांबू डेपोवर पुरेसा व योग्य दर्जाचा बांबू उपलब्ध नसून, पुरवठा देखील होत नसल्यामुळे बुरड व्यवसाय संकटात आला आहे.

    लाखांदूर (Lakhandur).  दिवसभर कष्ट करून बुरड कामगार बांबूपासून विविध वस्तू तयार करतात. जगावर कोरोनाचे संकट असल्याने बुरड व्यवसायिक संकटात सापडले आहेत. त्यातच तालुक्यातील बांबू डेपोवर पुरेसा व योग्य दर्जाचा बांबू उपलब्ध नसून, पुरवठा देखील होत नसल्यामुळे बुरड व्यवसाय संकटात आला आहे. इतकेच नव्हे तर बुरडांना उदरनिर्वाह करण्याकरिता बांबूसाठी भटकंती करावी लागत असल्याचे चित्र आहे.

    मागील वर्षापासून कोरोनामुळे सर्व सामान्य जीवन होरपळून निघाला आहे. गत काही वर्षापासून बुरडांना बांबूचा पुरवठा होत नसल्याच्या तक्रारी आहेत. मात्र बुरडांच्या मागणीकडे शासन, प्रशासनाकडून नित्यानेच दुर्लक्ष होत आहे. या कठीण परिस्थितीत बुरड समाजाने जीवन कसे जगावे, कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा हा प्रश्न आहे. लाखांदूर तालुक्यात बारव्हा व दिघोरी/मोठी या ठिकाणी बुरड समाज आहे. मात्र सदर ठिकाणी पुरेसा बांबू पुरवठा न होणे हे शोभेचे आहे. त्यामुळे बांबूसाठी बुरड समाजाला भटकंती करण्याची वेळ आली आहे.

    सर्व ठिकाणच्या डेपोमधून परस्पर पत्र देऊन नवेगावबांध येथील डेपोमधून बांबू उचलण्याची परवानगी देण्यात येत आहे. जे जाऊ शकतात ते सोडा पण एखादा गरीब, दुबळा व हतबल व्यक्तीचे काय, त्यांनी व्यवसाय करू नये का? बाहेरील डेपोत बांबूकरिता गेल्यानंतर या कोरोना काळात देखील बुरडांना हप्ता – हप्ता बाहेर राहवे लागत असून, जिथे ना खाण्या पिण्याची व्यवस्था असते, ना निवाऱ्याची. मात्र पोटाची खळगी भरण्यासाठी जावे लागत असते. जिवाचे बरे वाईट झाल्यास जबाबदार कोण? मात्र अशाही स्थितीत बुरड बांधव जीवन जगण्यासाठी जबाबदारी स्विकारून बांबू आणण्याचा प्रयत्न करीत असून, हे बाब प्रशासनास कळत नाही का. असा प्रश्न त्यांच्या समोर उभा ठाकला आहे.

    दरम्यान, या समाजाच्या समस्या लक्षात घेऊन बुरड कामगारांना स्थानिक डेपोवर योग्य दर्जाचा व वाजवी बांबूचा पुरवठा करून बुराडांची होणारी होरपळ व भटकंती थांबविण्यात यावी अशी मागणी विदर्भ बुरड कामगार संघ लाखांदूर यांनी केली असून, मागणी मान्य न झालास 1 मेपासून कोरोना काळात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.