रानडुकरांकडून पिकांचे नुकसान; वनविभागाने उपाययोजना करण्याची मागणी

आजमितीस गहू व हरभरा काढणीस आला आहे. काही निघालाही आहे. पण कापणीला आलेल्या गहू, हरभऱ्याला ही रानडुकरांनी सोडले नसून त्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहेत. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास जंगली प्राणी अशा रितीने हिसकावून घेत आहे.

    भंडारा (Bhandara).  आजमितीस गहू व हरभरा काढणीस आला आहे. काही निघालाही आहे. पण कापणीला आलेल्या गहू, हरभऱ्याला ही रानडुकरांनी सोडले नसून त्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहेत. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास जंगली प्राणी अशा रितीने हिसकावून घेत आहे. शहरासह तालुक्यात रानडुक्कर, रोही, हरिण आदि वन्यप्राण्यांचा शेतमालाला व पिकाला मोठ्या प्रमाणात त्रास आहे. वन्यप्राणी शेतपिकाचे भरून न निघणारे नुकसान करतात.

    वन्यप्राण्यांच्या त्रासामुळे शेतकऱ्याला पीक पध्दतीत बदल करावा लागतो. रानडुकरांचा त्रास गव्हाच्या तुलनेत हरभऱ्याला जास्त होतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी हरभरा लावण्याची इच्छा असूनही नाईलाजाने गहू लावला पण शेतकऱ्यांचा तो केवळ भ्रमनिरास ठरला. रानडुक्कर व रोह्यांनी सोडले नाही. गहू पिकाचेही या वन्यप्राण्यांनी मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे.

    ठोस उपाययोजना करणे आवश्यक
    शेतात ठिकठिकाणी हे वन्य प्राणी धुडगूस घालत असून त्या ठिकाणचा गहू, हरभरा मातीमोल करीत आहे. महत्त्वाचे म्हणजे नुकसान केलेले पीक एक टक्काही कामी येत नाही. वन्यप्राण्यांचा अटकाव करण्यासाठी ज्या उपाययोजना केल्या त्या सगळ्या कुचकामी ठरते. वन्यप्राणी शेतमाल मातीमोल करतात व शेतकऱ्याला त्याकडे उघड्या डोळ्यांनी पाहण्याखेरीज दुसरा पर्याय नसतो. हे दृष्टचक्र कधी थांबेल हेच शेतकऱ्यांना कळेनासे झाले एकतर रानडुकरांना वनविभागाने मारू टाकावे किंवा शेतकऱ्याला मारण्याची परवानगी द्यावी अशी मागणी शेतकरी करीत आहे. रानडुंकरांमुळे कुठलीही वन्यजीवांची साखळी तुटणार नसल्याने मोठ्या प्रमाणात संख्या असलेल्या रानडुकरांना ठार मारावे किंवा त्याची संख्या तरी नियंत्रित करावी, अशी मागणी या निमित्ताने शेतकरी करीत आहे. या रानडुकरामुळे दुचाकींचे अपघात होत आहेत.