अंतिम मुदत तोंडावर धानखरेदी संथगतीने; कोट्यवधीचे चुकारे थकीत

खरीप हंगामाच्या धानखरेदीची मुदत 31 मार्चपर्यंत आहे. दरम्यान अवघे 9 दिवस शिल्लक असताना गोदाम फुल्ल झाल्याच्या सबबीखाली धानाची खरेदी संथगतीने सुरू आहे.

  साकोली (Sakoli).  खरीप हंगामाच्या धानखरेदीची मुदत 31 मार्चपर्यंत आहे. दरम्यान अवघे 9 दिवस शिल्लक असताना गोदाम फुल्ल झाल्याच्या सबबीखाली धानाची खरेदी संथगतीने सुरू आहे. गेल्या चार तीन दिवसांपासून अवकाळी पाऊस हजेरी लावत असल्याने उघड्यावर ठेवलेले धान भिजत असून शेतकरी हवालदिल झाला आहे.

  तालुक्यातील शासकीय धान खरेदी केंद्रांमधील गोदामे तुडुंब झाल्याचे कारण समोर करून धानाची खरेदी करण्यास दिरंगाई केली जात आहे. परंतु, त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. वातावरणात अचानक बदल झाला असून तीन दिवसांपासून अवकाळी पाऊस येतो आहे. शेतकऱ्यांनी केंद्रावर विक्रीसाठी आणलेले धान बाहेर पडून आहे. वातावरणातील आर्द्रता तसेच पावसात सापडल्याने धानाला अंकुर फुटण्याची, धान काळे पडण्याची व सडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

  असे धान खरेदी करण्यास केंद्रावर नकार दिला जातो. पर्यायाने शेतकऱ्यांना नुकसान सहन करावा लागते. आधीच शेतकरी उत्पादन घटल्याने हवालदिल झाला आहे. अशा परिस्थितीत होणारे दुहेरी नुकसान त्याला सोसवणारे नाही. दुसरीकडे कोरोनाची दहशत दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत पुन्हा टाळेबंदी व संचारबंदीसारखे निर्बंध आल्यास पुन्हा नवीन समस्येला तोंड द्यावे लागू शकते.

  धान उत्पादनाच्या तुलनेत गोडाऊनची कमतरता मागील अनेक वर्षापासून कारणीभूत ठरत आहे. शासकीय आधारभूत केंद्रावर धानाची खरेदी मोठ्या प्रमाणात करण्यात आली. मात्र, धानाची उचल वेळेवर होत नसल्याने शेतकऱ्यांना विक्रीसाठी आणलेले धान खुल्या जागेत ठेवावे लागत आहेत.

  चुकारे कधी मिळणार ?
  साकोली येथील श्रीराम सहकारी भात गिरणीच्या शासकीय आधारभूत केंद्रावर 9 नोव्हेंबर 2020 पासून खरेदी सुरू झाली. 17 मार्चपर्यंत 51 हजार 299 क्विंटल धान खरेदी करण्यात आली. 41 हजार 145 क्विंटल धानाचे चुकारे देण्यात आले. यापैकी 10 हजार 154 क्विंटल खरेदी केलेल्या धानाचे एक कोटी 89 लाख रुपये बाकी असल्याने शेतकरी चुकाऱ्यासाठी चकरा मारीत आहेत.