
भंडारा. सध्या संपूर्ण देशावर कोरोनाचे (corona) संकट घोंगावत आहे. भंडारा जिल्ह्यातील बाधितांची संख्याही २४१५ हजारांच्या पार गेली आहे. कोरोना प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी उपाययोजना करत असली तरी बाधितांसह मृतकांची संख्याही सातत्याने वाढत आहे. अशातच आता डेंग्यू (dengue) आजारानेसुद्धा डोके वर काढले आहे. भंडारा शहरासह तालुक्यातील गावखेड्यात डेंग्यूचा प्रादुर्भाव अधिक दिसून येत आहे. घरोघरी डेंग्यूचे रुग्ण आढळून येत आहे. काही भागात डेंग्यूचे बालरुग्णसुद्धा मोठ्या प्रमाणात आढळले आहेत. अनेक नागरिकांवर खासगी तसेच सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
डेंग्यू हा संसर्गजन्य आजार नाही. एडीज इजिप्ती नामक मादी डास चावल्याने डेंग्यू होतो. अती ताप, अंगदुखी, डोके दुखणे, मळमळ ब उलट्या, अंगावर लालसर पुरळ येणे, ही डेंग्यूची प्राथमिक लक्षणे प्रामुख्याने लहान मुलांमध्ये आढळून येतात. अती जास्त ताप, सतत उलट्या, हातपाय थंड पडणे, सुस्तपणा, नाक व तोंडावाटे रक्तस्त्राव ही डेंग्यूची गंभीर लक्षणे आहेत. तेव्हा अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. डेंग्यूकडे लक्ष न दिल्यास हा आजारदेखी जीवघेणा ठरू शकतो. बालकांमध्ये याचे प्रमाण अधिक असू शकते. तेव्हा लहान मुलांमध्ये डेंग्यूची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. डेंग्यूला घाबरू नका. फक्त काही उपाय करणे आवश्यक आहे.