fadanvis

देवेंद्र फडणवीस यांनी आज भंडारा दौऱ्यात(Bhandara Visit) जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर काही महिन्यांपूर्वी आग लागलेल्या भंडारा सिव्हिल रुग्णालयालाही(Civil Hospital) भेट दिली.

  भंडारा: आघाडी सरकारचा सामाजिक न्याय केवळ बोलण्यापुरताच आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस(Devendra Fadanvis) यांनी केली आहे. मागासवर्गीयांच्या पदोन्नतीतील आरक्षणाच्या मुद्दयावरून आघाडी सरकारमध्येच विसंवाद निर्माण झाला आहे. त्यावरून फडणवीस यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे.  देवेंद्र फडणवीस यांनी आज भंडारा दौऱ्यात(Bhandara Visit) जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर काही महिन्यांपूर्वी आग लागलेल्या भंडारा सिव्हिल रुग्णालयालाही(Civil Hospital) भेट दिली. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

  सामाजिक न्याय बोलण्यापुरता आहे

  पदोन्नतीतील आरक्षणाबाबत प्रतिक्रिया विचारली तेव्हा ते म्हणाले की, पदोन्नतीतील आरक्षणाबाबत आघाडी सरकारची भूमिका दुटप्पी आहे. याबाबत एकाने वेगळे बोलायचे आणि दुसऱ्याने आणखी वेगळे सांगायचे हे त्यांचे ठरले आहे. यांचा सामाजिक न्याय बोलण्यापुरता आहे. त्यांचा बोलण्याचा सामाजिक न्याय वेगळा आहे आणि कृतीतील सामाजिक न्याय वेगळा आहे, अशी टीका फडणवीसांनी केली.

  म्युकर मायकोसिस रुग्णाचे निदान वेळेत करा

  भंडाऱ्यातील कोरोना परिस्थितीवर बोलताना फडणवीस यानी समाधान व्यक्त केले. दुसऱ्या लाटेत भंडाऱ्यातील स्थिती अत्यंत खराब होती. आता भंडाऱ्यातील रुग्ण संख्या कमी झाली असून परिस्थिती निवळत आहे, असे ते म्हणाले. कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी तयारी सुरू आहे. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे लहान मुलांसाठी आरोग्य केंद्र उभारण्यात येत आहे. खासदार या गोष्टींकडे लक्ष ठेवून आहेत, असे फडणवीस म्हणाले.

  भंडाऱ्यात म्युकर मायकोसिसचे काही रुग्ण सापडले आहेत. पण या रुग्णांचे ऑपरेशन करण्याची सुविधा भंडाऱ्यात नाही. नागपूरला रुग्ण न्यावे लागतात. मात्र, म्युकर मायकोसिसच्या रुग्णाचे लवकर निदान होऊन त्याच्यावर तात्काळ उपचार केले तर परिस्थिती नियंत्रणात येईल,अश्या सूचनाच प्रशासनाला दिल्याचे ते म्हणाले.

  फायर सेफ्टी यंत्रणा अजूनही नसणे अक्षम्य निष्काळजीपणा
  सिव्हिल रुग्णालयात दहा बालकांचा मृत्यू झाला होता. या घटनेला काही महिने उलटून गेले आहेत. मात्र अजूनही रुग्णालयात फायर सेफ्टी यंत्रणा बसविण्यात आली नाही. आता टेंडर निघाल्याचे सांगितले जात आहे. पण त्याबाबतची अधिक माहिती नाही. एवढी मोठी दुर्घटना होऊनही फायर सेफ्टी यंत्रणा न बसविणे हा अक्षम्य निष्काळजीपणा आहे, असे ते म्हणाले.