देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भंडाऱ्यात धडक मोर्चा; १० नवजात बालकांच्या मृत्यू प्रकरणात सरकार उदासीन?

१० निर्दोष बालकांच्या मृत्यूप्रकरणी दोषींवर तत्काळ कठोर कारवाई करा, या व अशा अनेक मागण्यांसंदर्भात आज भंडारा जिल्हा भाजपाने या मोर्चाचे आयोजन केले होते. माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, डॉ. परिणय फुके आणि इतरही नेते यावेळी उपस्थित होते.

भंडारा.  भंडार्‍यात १० निष्पाप बालकांचा जीव गेल्यानंतरही राज्य सरकारचा नाकर्तेपणा, दूध, धान उत्पादक आणि शेतकर्‍यांचे विविध प्रश्न इत्यादी मागण्यासंदर्भात आज माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात भंडार्‍यात विशाल धडक मोर्चा काढण्यात आला आहे.

१० निर्दोष बालकांच्या मृत्यूप्रकरणी दोषींवर तत्काळ कठोर कारवाई करा, या व अशा अनेक मागण्यांसंदर्भात आज भंडारा जिल्हा भाजपाने या मोर्चाचे आयोजन केले होते. माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, डॉ. परिणय फुके आणि इतरही नेते यावेळी उपस्थित होते.

भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात ९ जानेवारीच्या मध्यरात्री नवजात मुलांच्या अतिदक्षता कक्षात लागलेल्या आगीत १० नवजात मुलांचा होरपळून मृत्यू झाला होता. आज या घटनेला १६ दिवसांचा कालावधी लोटला असला तरी, अद्यापही गुन्हे दाखल झाले नाहीत.

तर दुसरीकडे  दूध उत्पादक शेतकर्‍यांचे दीड वर्षांपासून थकित असलेले चुकारे त्वरित द्या, धानखरेदीतील भ्रष्टाचार थांबवा, कामगारांना कल्याण योजनेचा लाभ द्या, कोरोना काळातील वीजबिल कमी करा, पूरपीडितांना योग्य मदत द्या, नियमित कर्ज भरणार्‍या शेतकर्‍यांना योग्य मदत द्या अशा मागण्याही या धडक मोर्चात करण्यात आल्या.