मध्यमवर्गीय कुटुंबावर आर्थिक संकट; कोणी देईना मदतीचा हात

लॉकडाऊनमुळे शहरातील बरेच सामान्य व निम्न मध्यमवर्गीय नागरिकांना कुटुंबाच्या पालनपोषणाची चिंता सतावत आहे. गरीब व दारिद्रय रेषेखालील लोकांना शासन मदत करते. परंतु, राशन धान्यासाठी व मदतीसाठी पात्र नसलेल्यांना कोणापुढे हातही पसरता येत नाही.

    तुमसर (Tumsar).  लॉकडाऊनमुळे शहरातील बरेच सामान्य व निम्न मध्यमवर्गीय नागरिकांना कुटुंबाच्या पालनपोषणाची चिंता सतावत आहे. गरीब व दारिद्रय रेषेखालील लोकांना शासन मदत करते. परंतु, राशन धान्यासाठी व मदतीसाठी पात्र नसलेल्यांना कोणापुढे हातही पसरता येत नाही. तोंड दाबून बुक्क्यांचा मार त्यांना सोसावा लागत आहे.

    परिस्थिती बरी,वाईट कशीही असली तरी नेहमीच मध्यमवर्गीय भरडले जातात. लॉकडाउनमध्येही सरकारकडून त्यांच्यासाठी कोणतीही विशेष योजना किंवा मदतीचा लाभ दिला जात नाही. मुलांचे शिक्षण, पालनपोषण तसेच सरकारला कर देणे. प्रत्येक परिस्थितीत त्यांना खर्च करावाच लागतो. कोरोनामुळे व्यवसाय, रोजगार ठप्प आहे. आवक नसली तरी खर्च मात्र कमी झाले नाहीत. अशा परिस्थितीत आपली गरज पूर्ण करण्यासाठी त्यांना कोणासमोर हातही पसरता येत नाही.

    गोरगरीब, मजूरवर्ग आपल्या अडचणी सांगून मदत मागतात. पण मध्यमवर्गीयांना मात्र कुचंबना सोसावी लागते. सरकारी नोकरदारांना काम न करताही महिन्याला पगार मिळतो. परंतु ज्यांची लघुउद्योग, दुकाने, लहान व्यवसाय बंद आहे. त्यांच्यासमोरील प्रश्न गंभीर आहे. गरिबांना सरकारकडून मदत मिळते. परंतु नेहमी आपत्तीच्यावेळी मध्यमवर्गीयांना संकटांचा सामना करावा लागतो.