माजी आमदाराच्या कारला टिप्परची जबरदस्त धडक; वाहनाचा चुराडा

    भंडारा (Bhandara) : गणेशमूर्ती स्थापनेसाठी सहकुटुंब नागपूरवरून आपल्या गावी परतणाऱ्या माजी आमदार सेवक वाघाये यांच्या कारला राष्ट्रीय महामार्गावरील बोरगावजवळ एका टिप्परने मागून धडक दिली. यात कारचा चुराडा झाला; मात्र सेवक वाघायेसह संपूर्ण कुटुंबाला कोणतीही दुखापत झाली नाही.

    माजी आमदार सेवक वाघाये शुक्रवारी गणेशमूर्ती स्थापनेसाठी नागपूरवरून आपल्या मर्सिडिज कार क्रमांक एमएच ३१ एफ आर १११ ने लाखनी तालुक्यातील केसलवाडा या मूळगावी जात होते. कारमध्ये त्यांच्या पत्नी सरोज वाघाये, मुले सम्राट आणि विराट होते. राष्ट्रीय महामार्गावरून भंडारा तालुक्यातील बोरगावजवळ मागाहून आलेल्या टिप्परने कारला जबर धडक दिली.

    यात कारच्या मागच्या भागाचा अक्षरश: चुराडा झाला; परंतु कुणालाही साधे खचरटले नाही. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या वाहनाने सेवक वाघाये परिवारासह केसलवाडाकडे रवाना झाले.