प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

अडीच वर्षापूर्वी भूमिपूजन झालेल्या गोबरवाही जल वाहिनीचे काम ठप्प असल्याने 21 गावांतील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे.

    गोबरवाही (Gobarvahi).  अडीच वर्षापूर्वी भूमिपूजन झालेल्या गोबरवाही जल वाहिनीचे काम ठप्प असल्याने 21 गावांतील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे. ही योजना मृगजळ ठरल्याचे कटू व दाहक वास्तव समोर आले आहे.

    उन्हाळा सुरू झाल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणखीनच गंभीर होत चालला आहे. गोबरवाही परिसरातील चिखला, गर्रा बघेडा, आष्टी, आंबागड या चार जिल्हा परिषद क्षेत्रात 21 गावांतील नागरिकांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटावा याकरिता गोबरवाही जलवाहिनी योजनेचे विस्तारीत काम राजीवसागर बावनथडी येथून कार्यान्वित होणार होते. या कामाचे भूमिपूजन अडीच वर्षापूर्वी तत्कालीन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले होते.

    मात्र कोट्यवधी रुपयांच्या योजनेचे काम सहा महिन्यांतच बंद पडले. केंद्र सरकारने 2024 पर्यंत प्रत्येक घरात शुध्द पाणी पुरवठा करण्याचे ध्येय ठेवले आहे. तथापि, ही योजना दोन वर्षापासून बंद पडली आहे. 21 गावांसाठी ही योजना मृगजळ ठरल्याचे सिद्ध होत आहे. कडक उन्हाळा सुरू होण्यापूर्वी या योजनेचे काम पूर्ण करून पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी होत आहे.