गडकरी-फडणवीस यांनी बांधलेली हॉस्पिटल आम्हाला कशी दिसत नाहीत; विजय वडेट्टीवार यांचा चिमटा

भाजप नेते नितीन गडकरी- देवेंद्र फडणवीस यांनी हवेत कोविड हॉस्पिटल बांधली का? असा रोकडा सवाल करत फडणवीस-गडकरींनी बांधलेली हॉस्पिटल आम्हाला कशी दिसत नाहीत, असा प्रतिप्रश्न काँग्रेस नेते आणि मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी  केला आहे.

  भंडारा : भाजप नेते नितीन गडकरी- देवेंद्र फडणवीस यांनी हवेत कोविड हॉस्पिटल बांधली का? असा रोकडा सवाल करत फडणवीस-गडकरींनी बांधलेली हॉस्पिटल आम्हाला कशी दिसत नाहीत, असा प्रतिप्रश्न काँग्रेस नेते आणि मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी  केला आहे.

  सोमवारपासून कठोर कारवाई

  भंडारा येथे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते म्हणाले की, सोमवारपासून अनावश्यक घराबाहेर फिराल तर पोलीस कारवाई करणार असल्याचे सांगितले. लोक घाबरून जाऊ नयेत म्हणून सरकार नरमाईने वागत होते, मात्र लोक ऐकत नसून सोमवारपासून कठोर कारवाई करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.

  हे वृत्त खोटे

  ऑक्सिजनबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सोबत फोनवर चर्चा झाली असून, ऑक्सिजन पुरवठ्यासाठी लष्करी मदत ही मागितली. मात्र केंद्राकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याच्या उल्लेख वड्डेट्टीवार यांनी केला. गुजरात आणि मध्य प्रदेश राज्याची स्थिती हाताबाहेर गेल्याचेही त्यांनी सांगितले. गोंदियातील वैद्यकिय महाविद्यालयात काल २९ जणांचा मृत्यू झाला असून त्यापैकी ऑक्सिजन अभावी १५ रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या माहितीमुळे एकच खळबळ उडाली होती. मात्र हे वृत्त खोटे असल्याचा दावा हॉस्पिटल प्रशासनाने केला आहे. स्वत: विजय वडेट्टीवार यांनी गोंदियातील २९ मृतांमध्ये बाहेरील राज्यातील लोकांचा समावेश असल्याचे म्हटले आहे. ऑक्सिजन अभावी रुग्णांचा मृत्यू झाल्याचे वृत्त खोटे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

  मध्यप्रदेशातील रुग्णांचा समावेश

  गोंदियात लगत असलेल्या मध्यप्रदेशातून कोरोनाचे गंभीर रुग्ण उपचारासाठी गोंदियात येतात. खासगी रुग्णालये गंभीर रुग्णांना भरती करून घेण्यास नकार देत आहेत. त्यामुळे रुग्णांना शासकीय रुग्णालयात दाखल केले जात आहे. गंभीर आजारी असलेले रुग्ण रुग्णालयात उशिराने उपचारासाठी येतात. त्यामुळे त्यांना वाचवणे कठिण जाते, असे वडेट्टीवार म्हणाले. मात्र, काल दगावलेले सर्वच्या सर्व २९ रुग्ण गोंदियातील नाहीत. मध्यप्रदेशातील रुग्णांचाही त्यात समावेश आहे, असंही त्यांनी सांगितले.