प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मानधन तत्त्वावर कार्यरत असलेल्या ग्रामरोजगार सेवकांना मानधन वाढ करावी, अशी मागणी ग्रामविकास मंत्री, रोजगार हमी योजना मंत्री, नियोजन मंत्री यांच्याकडे करण्यात आली होती.

    पालांदूर (Palandur).  महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मानधन तत्त्वावर कार्यरत असलेल्या ग्रामरोजगार सेवकांना मानधन वाढ करावी, अशी मागणी ग्रामविकास मंत्री, रोजगार हमी योजना मंत्री, नियोजन मंत्री यांच्याकडे करण्यात आली होती. अखेर या मागणीला यश आले असून राज्य शासनाने रोजगार सेवकांच्या मानधनात प्रचलित पद्धतीनुसार एकूण कामानुसार सहा टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे.

    महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत ग्रामपंचायतनिहाय एकूण निर्माण होणाऱ्या संचयित मनुष्य दिवसाच्या अनुषंगाने प्रतिमाह एकत्रित मानधन देण्याचा निर्णय राज्याच्या नियोजन विभागाने 8 मार्चला घेतला आहे. त्यानुसार वार्षिक व मासिक मानधन जाहीर करण्यात आले आहे. 750 मनुष्य दिवस निर्मिती झाल्यास प्रचलित पद्धतीनुसार सहा टक्के एकूण कामाच्या मानधन दिले जाणार आहे. 751 ते 1500 दिवस निर्मिती झाल्यास वार्षिक 24 हजार तर मासिक दोन हजार रुपये मानधन मिळणार आहे. 1501 ते 2500 रुपये मनुष्य दिवस निर्मिती केल्यास वार्षिक 36 हजार रुपये तर मासिक तीन हजार रुपये मानधन, 2501 ते 4000 मनुष्य दिवसाची निर्मिती केल्यास वार्षिक 42 हजार तर मासिक 3 हजार 500 रुपये मानधन दिले जाणार आहे. 4001 ते 5500 मनुष्य दिवस निर्मिती झाल्यास वार्षिक मानधन 48 हजार तर मासिक चार हजार, 5501 ते सात हजार मनुष्य दिवसाचे निर्मिती झाल्यास वार्षिक 54 हजार मानधन तर महिन्याकाठी चार हजार पाचशे रुपये मानधन मिळणार आहे.

    उपरोक्त मानधनवाढीबाबत नियोजन विभागाने आवश्यक त्या सूचना व नियम 8 मार्चच्या शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. त्यानुसारच ग्रामरोजगार सेवकांना मानधन वाढीचा लाभ मिळणार आहे. यापूर्वी एक हजार मनुष्य दिवस निर्मिती पर्यंत एकूण मजुरी प्रदान नुसार केवळ 2.25 टक्के दिली जात होती. त्यात सुधारणा होऊन आता सहा टक्के मानधन वाढ करण्यात आली आहे.

    निर्मितीनंतरच होणार फायदा
    ग्रामरोजगार सेवक मानधन तत्त्वावर कार्यरत आहेत. रोजगार हमी योजनेची कामे गावात मोठ्या प्रमाणात उपलब्ध केल्यानंतर रोजगार सेवकांना मानधन वाढीचा प्रत्यक्ष फायदा होणार आहे. ज्याठिकाणी रोजगार हमी योजनेची कामे सुरू नाहीत, अशा ठिकाणी मनुष्य निर्मिती होत नाही. त्यामुळे येथील रोजगार सेवकांना मानधन मिळत नाही. मात्र, ज्या ठिकाणी रोजगार हमी योजनेची कामे सुरू आहेत, अशा ठिकाणी मनुष्यनिर्मित होते. त्यामुळे रोजगार सेवकांना मानधन मिळते. यापुढे मनुष्य दिवस निर्मिती प्रत्येक ठिकाणी तसेच मोठ्या प्रमाणावर केल्यास रोजगार सेवकांना मानधन वाढीचा फायदा होणार आहे.