तहसीलदारांकडून धान गोदामांची तपासणी; परराज्यातून होणाऱ्या आयातीला प्रतिबंध

लाखांदूर तालुक्यात परराज्यातून होणाऱ्या धान तस्करीच्या अनुषंगाने प्रतिबंध घालण्यासाठी जिल्ह्याच्या सीमेवर करडी नजर ठेवली जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार लाखांदूरचे नायब तहसीलदार अखिलभारत मेश्राम तालुक्यातील धान खरेदी केंद्रावर जाऊन तपासणी मोहीम आरंभली आहे.

    लाखांदूर (Lakhandur).  परराज्यातून होणाऱ्या धान तस्करीच्या अनुषंगाने प्रतिबंध घालण्यासाठी जिल्ह्याच्या सीमेवर करडी नजर ठेवली जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार लाखांदूरचे नायब तहसीलदार अखिलभारत मेश्राम तालुक्यातील धान खरेदी केंद्रावर जाऊन तपासणी मोहीम आरंभली आहे.

    अन्य राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात धानाला जास्त भाव मिळत असल्यामुळे परप्रांतीय व्यापारी आपले धान महाराष्ट्रात विकायला आणत असल्याची बाब उघड झाली होती. काही दिवसांपूर्वी जिल्ह्यात बाहेरून आलेल्या धानाचे तीन ट्रक पकडण्यात आले होते. या प्रकारावर आळा घालण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पथक गठीत करून जिल्ह्याच्या सीमा बंद करून घेतल्या आहेत. तसेच धान खरेदी केंद्रावर परराज्यातील धानाची तपासनी चालू आहे.

    दरम्यान लाखांदुरचे नायब तहसीलदार अखिलभारत मेश्राम यांनी मंगळवारी तालुक्यातील बहुतांश आधारभूत धान खरेदी केंद्रावर जाऊन परराज्यातील धानाची तपासणी केली. तेव्हा कोणत्याही धान खरेदी केंद्रावर तालुक्यातील शेतकऱ्यांव्यतिरिक्त बाहेरच्या धानाची खरेदी झाली नसल्याचे दिसून आले आहे. तालुक्यातील सर्वच आधारभूत धान खरेदी केंद्रांची तपासणी केली जाणार असून, यात काही गौडबंगाल आढळून आल्यास संबंधितांवर फौजदारी कारवाई केली जाणार आहे.