भंडारा जिल्ह्यातील तलावात निम्म्यापेक्षाही कमी जलसाठा; प्रशासनाच्या चिंतेत वाढ

जुलै महिन्यापासून पावसाचा जोर वाढतो. मात्र, मध्यंतरी अनेक दिवस पावसाने हुलकावणी दिली होती. यामुळे भंडारा जिल्ह्यातील अनेक होतकऱ्यांची धानाची रोवणी होऊ शकली नाही. हलक्या धानाची मुदत संपल्याने होतकरी रोवणी करण्यास असमर्थ आहेत. प्रकल्पाचे पाणी सोडले जात नाही.

    भंडारा (Bhandara) : तलावांचा जिल्हा (lake district) म्हणून प्रसिद्ध असलेल्या भंडारा जिल्ह्यात यावर्षी पावसाच्या (Rains Percent in Bhandara District) लहरीपणाने भर पावसाळ्यात जलसाठे (water storage) अद्यापही निम्मेच भरले आहे. गतवर्षीच्या तुलनेत जलसाठ्यात ३३ टक्क्यांनी घट आहे. यावर्षी शुक्रवारपर्यंत ६३ प्रकल्पांत केवळ ४० टक्के जलसाठा उपलब्ध आहे.

    १ जून ते २० ऑगस्ट या कालावधीत जिल्हाभरात ९०५.३ मिमी पाऊस पडणे अपेक्षित होते. मात्र, प्रत्यक्षात केवळ ७२८.६ मिमी पाऊस झाला आहे. जुलै महिन्यापासून पावसाचा जोर वाढतो. मात्र, मध्यंतरी अनेक दिवस पावसाने हुलकावणी दिली होती. यामुळे भंडारा जिल्ह्यातील अनेक होतकऱ्यांची धानाची रोवणी होऊ शकली नाही. गत तीन दिवसांपूर्वी पावसाला सुरुवात झाली आहे. तरीही काही तालुक्‍यांमध्ये पावसाचे प्रमाण कमी आहे.

    भंडारा जिल्ह्यात पाटबंधारे विभागांतर्गत चार मध्यम, ३१ लघु प्रकल्प, तर २८ जुने मालगुजारी तलाव आहेत. २० ऑगस्ट रोजी ६३ प्रकल्पांत एकूण ४९.४८ दलघमी उपयुक्त साठा असून, त्याची टक्केवारी ४०.६३ एवढी आहे. गतवर्षी याच दिवशी एकूण ८५.६२ दलघमी उपयुक्त साठा होता. त्याची टक्केवारी ७०.३३ एवढी होती. २०१९ची आकडेवारी लक्षात घेता २० ऑगस्ट रोजी ६७.३६ दलघमी उपयुक्त साठा असून, त्याची टक्केवारी ५५.३३ एवढी होती.

    हलक्या धानाची मुदत संपली
    ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा नाही, असे होतकरी कमी कालावधी येणाऱ्या धानाची लागवड करतात. याला हलके धान संबोधले जाते. यावर्षी पावसाने जुलै महिन्यात दडी मारली. सिंचनाची सुविधा असलेल्यांनी रोवणी आटोपली. मात्र, सिचंनाची सुविधा नसलेल्या शेतकऱ्यांना रोवणीपासून मुकावे लागले. आता दोन दिवसांपासून जिल्ह्यात दमदार पाऊस आहे. मात्र, हलक्या धानाची मुदत संपल्याने होतकरी रोवणी करण्यास असमर्थ आहेत. प्रकल्पाचे पाणी सोडले जात नाही.