सुगंधित तंबाखूचा ट्रक जप्त ; ७३ लाखांचा माल घेतला ताब्यात

लॉकडाऊनमध्ये सुगंधित तंबाखूची तस्करी करून वाहतूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीवर स्थानिक गुन्हे शाखेने धडाकेबाज कारवाई करून दोन ट्रकसह 73 लाख 36 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. लॉकडाउन सुरू असून छत्तीसगढ राज्यातून महाराष्ट्र राज्यात अवैधरित्या प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असल्याची माहिती भंडारा जिल्हा पोलिस अधिक्षक वसंत जाधव आणि अपर पोलिस अधिक्षक अनिकेत भारती यांना प्राप्त झाली.

    भंडारा (Bhandara).  लॉकडाऊनमध्ये सुगंधित तंबाखूची तस्करी करून वाहतूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीवर स्थानिक गुन्हे शाखेने धडाकेबाज कारवाई करून दोन ट्रकसह 73 लाख 36 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. लॉकडाउन सुरू असून छत्तीसगढ राज्यातून महाराष्ट्र राज्यात अवैधरित्या प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असल्याची माहिती भंडारा जिल्हा पोलिस अधिक्षक वसंत जाधव आणि अपर पोलिस अधिक्षक अनिकेत भारती यांना प्राप्त झाली.

    तस्करीवर भंडारा जिल्हा पोलिस करडी नजर ठेवून होते. छत्तीसगढ राज्यातून दोन ट्रकमध्ये महाराष्ट्र राज्यात अवैधरित्या प्रतिबंधित वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक जयवंत चव्हाण हे स्वत: पथकासह लाखनी ते केसलवाडा मार्गे अड्याळ रोडवर तिर्री गावाच्या समोर पोहोचले. त्यांनी अचानक नाकाबंदी करुन ट्रक क्र. सीजी 04 जेसी 1424, व ट्रक क्र. सीजी 04 एमटी 6501, हे दोन्ही ट्रक थांबविण्याचा इशारा दिला. त्यातील एक ट्रक चालकाने जागीच थांबविला तर दुसरा चालक ट्रक घेवून पसार झाला. थांबविलेल्या ट्रकची झडती घेतली असता, त्यात ईगल हुक्का शिशा प्रतिबंधित सुगंधित तंबाखूच्या 66 पांढऱ्या रंगाच्या प्लास्टिक पोतड्या, प्लास्टिक पांढऱ्या रंगाच्या पोतड्यांमध्ये 62 खोक्यामध्ये मजा 108 हुक्का प्रतिबंधित सुगंधित तंबाखू असा एकूण 2,210 किलो ग्राम वजनाचा 42,55,200 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.

    दुसरा ट्रक लाखांदुरात पकडला
    मौक्यावरुन पोलिसांची नाकाबंदी पाहून पळविलेला लाखांदूरचे ठाणेदार मनोहर कोरेटी यांनी सूचना मिळाल्यावरून ताब्यात घेतला. दरम्यान चालक हा ट्रक सोडून पसार झाला होता. सदर ट्रक ताब्यात घेऊन पोलिस स्टेशन अड्याळ येथे आणून पाहणी केली असता ट्रकमध्ये ईगुल हुक्का शिशा प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखूच्या 15 पांढऱ्या प्लास्टीक पोतड्यांमध्ये एकूण 60 किलो ग्रॅम वजनाचा मुद्देमाल कि. 81,000 रुपयांचा मिळून आला. दोन्ही ट्रकमध्ये मिळून आलेल्या प्रतिबंधित सुगंधित तंबाखू मुद्देमालाची अन्न व औषधी प्रशासन विभाग भंडारा येथील सहायक आयुक्त (अन्न) अ.प्र. देशपांडे, अन्न सुरक्षा अधिकारी पि.व्ही. मानवटकर, भा.गो. नंदनवार यांनी पाहणी करुन अहवाल प्राप्त केला. अन्न सुरक्षा अधिकारी यांच्या अहवालावरुन दोन्ही ट्रकसहीत एकूण किंमत 73,36,200 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. यावरून चालक काशीनाथ पंकुसिंग सयाम (26), क्लिनर सत्तरसिंग जवाहर धुर्वे (24) दोघेही रा.बंगवार ता.जि. डिंडोरी (म.प्र.), आणि ट्रक क्रमांक सीजी 04 एमटी 6501 चालक यांच्यावर अन्न सुरक्षा व मानदे कायद्यान्वये अड्याळ पोलिस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.