मिरचीच्या सातऱ्यातून रोजगाराची नवी वाट ; शेकडो महिला, पुरुषांना मिळतेय काम

लाल गर्द भडक रंगाच्या मिरच्यांचा ढिग ठेवलेला पाहून जणूकाही गालीचे अंथरल्याचा भास होतो. प्रत्यक्षात अंगाची आग करणाऱ्या व ठसका लावणाऱ्या मिरची सातऱ्यात काम करताना खूप कष्ट व मेहनत घ्यावी लागते. या मिरची सातऱ्यातून पवनी व परिसरातील शेकडो महिला पुरुषांना लॉकडाऊनच्या काळातही रोजगार उपलब्ध झाला आहे.

  पवनी (Pawani).  लाल गर्द भडक रंगाच्या मिरच्यांचा ढिग ठेवलेला पाहून जणूकाही गालीचे अंथरल्याचा भास होतो. प्रत्यक्षात अंगाची आग करणाऱ्या व ठसका लावणाऱ्या मिरची सातऱ्यात काम करताना खूप कष्ट व मेहनत घ्यावी लागते. या मिरची सातऱ्यातून पवनी व परिसरातील शेकडो महिला पुरुषांना लॉकडाऊनच्या काळातही रोजगार उपलब्ध झाला आहे.

  पवनी तालुक्यात मोठ्या प्रमाणात मिरचीचे उत्पादन घेतले जाते. नजिकचे उमरेड व भिवापूर हे तालुकेसुद्धा उत्तम प्रतीच्या मिरची उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून पवनीत मिरची सातऱ्याचा उद्योग सुरू आहे. या सातऱ्यात मिरच्यांची गुणवत्तेनुसार प्रतवारी करून देठ खुडण्याचे काम केले जाते. या मिरची सातऱ्यावर महिला आपल्या लहान बाळांना व मुलांना घेवून दिवसभर राबतात.

  मेहनतीचे काम
  दिवसभर अंगाची लाही लाही करणारे ऊन व मिरचीमुळे होणारा दाह सहन करून पोटासाठी हे मजूर जीवाचे हाल करून राबत असतात. हा व्यवसाय जवळपास वर्षभर सुरू असतो. पावसाळ्याच्या चार महिन्यात तेवढा अवकाश असतो. उन्हाळ्यात मिरची निघण्याचा हंगाम सुरू असल्याने या दिवसात घडीचीही फुरसत नसते. जवळपास दोनशे ते अडीचशे मजूर या ठिकाणी राबतात. आजच्या घडीला पवनीत 4 सातरे आहेत. मिरचीला वाळविणे, देठ काढून प्रतवारीनुसार दहा किलोची पॅकिंग करणे असे काम सुरू आहे.

  यातील बहुतांश मिरची ही आंध्रप्रदेश राज्यातून येते. सफाई व पॅकिंग झाल्यानंतर ती इतरत्र पाठविली जाते. प्रतिकिलो मागे त्यांना मजुरी दिली जाते. पूर्वी एक किलो मागे दहा रुपये मिळायचे. आता बारा रूपये मिळतात. एक महिला पंधरा ते वीस किलो मिरची साफ करते. त्यामुळे दोनशे ते अडीचशे रुपये रोजी पडते.

  कोविड नियमांचे पालन
  या सातऱ्यात काम करणाऱ्या महिलांची कोविड चाचणी झाली असून त्या सुरक्षित अंतर राखूनच काम करतात. मागील वर्षी लॉकडाउनच्या काळात हा व्यवसाय बंद झाल्याने त्यांचा रोजगार हिरावल्या गेला होता. यावर्षी नियमांच्या अधिन राहून काम सुरू असल्याने त्यांना समाधान आहे.