वनसंपदा नष्ट होण्याच्या मार्गावर; जंगलांना उतरती कळा

भंडारा तालुक्याला जंगल, तलाव व सुपीक जमीन यांची देण लाभली आहे. मात्र, विविध कारणांनी या जंगलांना उतरती कळा लागली. ही बहुमूल्य वनसंपदा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.

    भंडारा (Bhandara).  तालुक्याला जंगल, तलाव व सुपीक जमीन यांची देण लाभली आहे. मात्र, विविध कारणांनी या जंगलांना उतरती कळा लागली. ही बहुमूल्य वनसंपदा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.

    तालुक्यात घनदाट जंगल आहे. बहुमूल्य अशी वनसंपदा आहे. परंतु शासनाच्या दुर्लक्षामुळे ही वनसंपदा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे़. तालुक्यात पागोरा, गोलेवाडी, सोनेगाव, वाकेश्वर, रावणवाडी, एटेवाई, खापा, मौदी, नवरगाव, मेंढा, श्रीनगर, बोरगाव (खुर्द) या गावांत दाट जंगल आहे. रावणवाडी, खापा, मेंढा, पागोरा या जंगलात ससे, हरीण, वाघ, रानवराह अशा अनेक वन्यप्राण्यांचे वास्तव्य आहे. परंतु आता जंगलाचे प्रमाण कमी होत असून या वन्यप्राण्यांच्या वास्तव्याला धोका निर्माण झाला आहे़. जंगलातील प्राणी आपला मोर्चा गावाकडे वळवित आहेत.

    याच जंगलामध्ये मोठ्या प्रमाणावर झाडे व वनौषधी मिळत होत्या, पण आता वनषौधीयुक्त वृक्ष दुर्मिळ झाले आहेत. सोबतच आवळा, बेहळा, हिरडे, बेल, येरून्या, चार, करवंद, टेंभर, सिंदोळे, चिचबिलाई अशी फळझाडेसुद्धा नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत़. वनविभागाच्या निष्काळजीपणामुळे ही बहुमूल्य वनसंपदा नष्ट होईल, असे वाटते. वने ओसाड होत चालली आहेत़.

    मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड होत आहे़. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडले आहे. संबंधित विभागाने उपाययोजना करणे गरजेचे आहे. वृक्ष लागवडीसाठी शासन अनेक प्रयत्न व नवनवीन उपक्रम राबवीत असते़. शासनाचेच अधिकारी जंगलमाफियांना वृक्षतोडीचे परवाने देत आहेत़.