धानाच्या पिकाचे झालेले नुकसान
धानाच्या पिकाचे झालेले नुकसान

पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात अवकाळी पावसासोबत झालेल्या गारपिटीचा उन्हाळी पिकाला तडाखा बसला. कापणीला आलेले धान, केळी, आंबा, भाजीपाला मातीमोल झाला. खरीप हंगामात किडीने पीक उद्ध्वस्त झाले असतानाच उन्हाळीपासून आशा होती. पण, ही आशाही आता मावळली आहे.

    भंडारा (Bhandara).   पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात अवकाळी पावसासोबत झालेल्या गारपिटीचा उन्हाळी पिकाला तडाखा बसला. कापणीला आलेले धान, केळी, आंबा, भाजीपाला मातीमोल झाला. खरीप हंगामात किडीने पीक उद्ध्वस्त झाले असतानाच उन्हाळीपासून आशा होती. पण, ही आशाही आता मावळली आहे.

    निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना दरवर्षी सहन करावा लागतो. मागील खरीप हंगामातील नुकसान भरून काढण्यासाठी उन्हाळी पीक लावण्यात आले. उन्हाळी धानाचा हंगाम अंतिम टप्प्यात आलेला आहे. काही शेतात कापणी, मळणी सुरू झालेली आहे. परंतु हातातोंडाशी आलेल्या पिकाला निसर्गाच्या दुष्टचक्रने लक्ष्य केले आहे. चार महिन्याच्या मेहनतीनंतर हातात आलेल्या पिकाला मातीमोल झालेले पाहून शेतकरी गहिवरला आहे. जिल्ह्यात बहुतांश भागात हीच परिस्थिती आहे. ग्रामीण भागात बहुतांश मातीची घरे आहेत. या कच्च्या घराचे नुकसानसुद्धा झालेले आहे.

    वर्धा जिल्ह्यातील पवनार भागात झालेल्या वादळी पावसाने केळी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. यासोबतच पपई, कांदा भाजीपालाही सडला आहे. या भागातील एका शेतकऱ्याने लागवड केलेल्या ड्रॅगन फ्रुटही हातचे गेले आहे. काही घरांची वादळाने पडझड झाली. शुभम दांडेकर यांच्या शेतामध्ये गेल्या तीन वर्षात ड्रॅगन फ्रुटच्या आधुनिक शेतीचा प्रयोग सुरू केला होता. लाखो रुपयांचा खर्च करून ही शेती उभी केली होती. अचानक झालेला वादळी पाऊस लाखोंचे नुकसान करून गेला आहे. कारंजा, देवळी, वर्धा तालुक्यातही गारपीट झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. आधीच करोनामुळे हतबल झालेला शेतकरी पुन्हा एकदा निसर्गाच्या तडाख्यात सापडला आहे. नुकसानग्रस्त शेताचे पंचनामे करून मदतीची अपेक्षा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.

    ५० हजारांची प्रोत्साहन राशी केव्हा?
    गोंदिया : देवरी, नवेगाव, सोनबिहारी आणि परिसरातील गावांत वादळी पाऊस आणि गारपिटीमुळे मोठे नुकसान झाले आहे. आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. धानाच्या बोनसची प्रतीक्षा कायम असताना नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांची प्रोत्साहन राशी देण्याची घोषणाही हवेत विरली आहे. ही रक्कम तातडीने देण्याची मागणी आमदार विनोद अग्रवाल यांनी केली आहे.