पारडी-मुरमाडी-मानेगाव रस्ते खराब; रस्त्यावरील डांबरीकरण उखडले

लाखांदूर तालुक्यातील पारडी ते मुरमाडी मानेगाव रस्त्यावरील डांबरीकरण उखडून गिट्टी बाहेर पडली असून रस्त्यावर खड्डे पडल्याने रस्त्यावरून नागरिकांना प्रवास करताना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.

    लाखांदूर (Lakhandur). लाखांदूर तालुक्यातील पारडी ते मुरमाडी मानेगाव रस्त्यावरील डांबरीकरण उखडून गिट्टी बाहेर पडली असून रस्त्यावर खड्डे पडल्याने रस्त्यावरून नागरिकांना प्रवास करताना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित विभागाच्या यंत्रणेने याबाबत वेळीच दखल घेऊन सदर रस्त्याचे तत्काळ डांबरीकरण करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

    पारडी, मुरमाडी, मानेगाव या परिसरातील शेतकरी, नागरिकांना तालुक्याचे ठिकाण असलेल्या लाखांदूर येथे दररोज आवागमन करावे लागते. तसेच विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षणासाठी याच मार्गावरून ये-जा करावी लागते. ऐवढेच नव्हे तर रुग्णांना औषधोपचारासाठी लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात जावे लागते.

    परंतु सदर रस्त्यावरील डांबर उखडून मोठमोठे खड्डे पडले असून पादचारी, वाटसरू, सायकलस्वार, दुचाकी तसेच चारचाकी वाहनधारकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. सदर रस्त्याचे डांबरीकरण करण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने अपघात झाल्यास जिवित व वित्तहानी होण्याची शक्यता नाकारता येत नसून यास जबाबदार कोण राहणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे.