पोलिस पाटलांना मिळणार कायद्याचे संरक्षण; शिवीगाळ, मारहाण केल्यास अजामीनपात्र गुन्हा

पोलिसांचा गावातील विश्वासू घटक आणि गावातील पोलिस व प्रशासनातील दुवा असणारा गावचा पोलिस पाटील तसा गटबाजीच्या राजकारणातही होरपळून निघतो. मात्र, आता तसे होणार नाही, कारण गावाच्या या रक्षकाला कोणी हात लावल्यास थेट शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल होणार आहे.

    भंडारा (Bhandara).  पोलिसांचा गावातील विश्वासू घटक आणि गावातील पोलिस व प्रशासनातील दुवा असणारा गावचा पोलिस पाटील तसा गटबाजीच्या राजकारणातही होरपळून निघतो. मात्र, आता तसे होणार नाही, कारण गावाच्या या रक्षकाला कोणी हात लावल्यास थेट शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल होणार आहे. कायद्याचे हे कवच मिळाल्याने आता पोलिस पाटील अधिक धिटाईने काम करू शकणार आहे.

    पोलिस विभागाचा आत्मा समजला जाणारा, गावपातळीवर कायदा सुव्यवस्थेचे काम करणारा महत्त्वाचा घटक म्हणजे पोलिस पाटील, गावातील कायदा-सुव्यवस्थेला जबाबदार असणाऱ्या पोलिस पाटलांना स्थानिक पातळीवर अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. कर्तव्य बजावत असताना पोलिस पाटलाला मारहाण झाल्याच्या अनेक घटनाही घडल्या आहेत. मात्र, आता यापुढे कर्तव्य बजावत असलेल्या पोलिस पाटलाला मारहाण, शिवीगाळ करणे महागात पडणार असून असे केल्यास सरकारी कामकाजात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल होणार आहे.

    राज्यातील पोलिस पाटील संदर्भात गृह विभागाने एक मोठा निर्णय घेतला असून पोलिस पाटील कर्तव्य बजावत असताना शिवीगाळ, मारहाण झाल्यास सरकारी कामात अडथळा आणला म्हणून संबंधितांविरुद्ध अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. याबाबतचा अध्यादेश नुकताच काढण्यात आला आहे.