पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा खंडित; लाखांदूर तालुक्यातील प्रकार

मागील काही महिन्यांपासून ग्रामपंचायत प्रशासनाकडून वीज बिलाचा भरणा न केल्याने तालुक्यातील आठ पाणीपुरवठा योजनेचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे.

    लाखांदूर (Lakhandur).  मागील काही महिन्यांपासून ग्रामपंचायत प्रशासनाकडून वीज बिलाचा भरणा न केल्याने तालुक्यातील आठ पाणीपुरवठा योजनेचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. या योजनेचा वीज खंडित झाल्याने गावकऱ्यांत पाणीपुरवठ्याअभावी  नाराजी व्यक्त केली जात आहे.

    गतवर्षी कोरोनाच्या परिस्थितीमुळे शासनाकडून वीज बिल माफ होण्याचा अंदाज नागरिकांमध्ये व्यक्त केला जात होता. यानुसार तालुक्यातील विविध संस्था व नागरिकांनी वीज बिलाचा भरणा केला नाही. यावेळी वीज बिल कंपनीद्वारा थकीत वीज बिल वसुली व वीज बिलाचा भरणा न करण्यावर वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेंतर्गत गत अनेक महिन्यांपासून तालुक्यातील आठ ग्रामपंचायत प्रशासनाकडून पाणीपुरवठा योजनेचे वीज बिल न भरल्यामुळे त्यांची वीज तोडण्यात आली आहे.

    लाखांदूर तालुक्यातील मुर्झा, मानेगाव, धर्मापुरी, तई (बुज), खैरी, ढोलसर, भागडी व नांदेड आदी गावांतील पाणीपुरवठा योजनेची विद्युत खंडित करण्यात आला आहे. ग्रामपंचायत क्षेत्रातील नागरिकांद्वारा कराचा भरणा न केल्याने सदर वीज खंडितची समस्या उद्भवली असल्याची चर्चा केली जात आहे. याप्रकरणी शासन प्रशासनाने दखल घेऊन तालुक्यातील पाणीपुरवठा योजना पूर्ववत होण्यासाठी आवश्यक कारवाई करा, अशी मागणी नागरिकांमध्ये केली जात आहे.

    विहिरीच्या पाण्याचा पिण्यासाठी वापर
    वीज बिलाचा भरणा न केल्याने तालुक्यातील आठ गावांतील पाणीपुरवठा योजनेची वीज तोडण्यात आली. यामुळे सदर गावांत पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. संबंधित गावात पिण्यासाठी बोअरवेल व विहिरीच्या पाण्याचा वापर होत असल्याची देखील माहिती देण्यात आली आहे.