मिरची मसाल्यांना भाववाढीचा तडका; उन्हाळ्याची चाहूल लागताच मिरची-मसाल्याचे दर वाढले

पेट्रोल, डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असतानाच जीवनावश्यक वस्तूसह भाजीपाला, गॅस सिलिंडरचे दर वाढल्याने सर्वसामान्यांचे बजेट बिघडले. तर महिन्याचा खर्च करताना गृहिणींनासुद्धा चांगलीच तारेवरची कसरत करावी लागत आहे.

    भंडारा (Bhandara).  पेट्रोल, डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असतानाच जीवनावश्यक वस्तूसह भाजीपाला, गॅस सिलिंडरचे दर वाढल्याने सर्वसामान्यांचे बजेट बिघडले. तर महिन्याचा खर्च करताना गृहिणींनासुद्धा चांगलीच तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यातच मिरची मसाल्यांचे भाव वधारल्याने भाववाढीचा तडका बसल्याचे चित्र आहे.

    मसाल्यांचे नाव घेताच चविष्ट व्यंजनाची आठवण येते. उन्हाळ्याची चाहूल लागताच मिरची-मसाल्याचे दर वाढले आहे. दरवर्षीच दरवाढ होते. कोरोनाकाळातही या पदार्थांमध्ये दरवाढ झाल्याचे दिसून आले. कुठलीही भाजी असो त्यात स्वादानुसार, मसाले घातले जातात. शाकाहार असो की अन्य श्रेणीतील व्यंजन एकही मसाल्याची वस्तू कमी पडली की भाजीची चव बिघडतेच. गोंदिया शहरातील बाजारपेठेत मसाल्यांची आवक चांगल्या प्रमाणात आहे. यंदा मात्र, मसाल्याचा दर किलोमागे 50 ते 170 रुपये पर्यंत वाढल्याचे दिसून आले. कोरोना संकटकाळात बहुतांश आस्थापने बंद असल्याने मालाची आवक पाहिजे त्या प्रमाणात विक्री झाली नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मिरची, मासाल्यांचा तडका बसल्याचे चित्र दिसत आहे.

    केशोरी आणि नागपूर येथून येते मिरची
    गोंदिया जिल्ह्यातही मिरची पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. केशोरीची मिरची अख्या जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. तरीही जिल्ह्याची आवश्यकता लक्षात घेता लाल मिरची ही नागपूरातून निर्यात केली जाते. नागपूर बाजारातील कॉटन मार्केटसह अन्य ठिकाणांहूनही मिरची जिल्ह्यात आणली जाते. जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रातूनही मिरचीचा पुरवठा केला जातो. याला मोठा ग्राहकवर्गही आहे.

    किचनमधील महत्त्वाचे व दररोज उपयोगात येत असलेल्या मसाल्यांचे दरही भरपूर वाढले आहेत. लग्नसराई व उन्हाळ्याची चाहूल लागताच ही दरवाढ निश्चित असते. पण मागील वर्षीच्या तुलनेत यंदाची दरवाढ मोठ्या प्रमाणात झाली आहे. याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. यात उत्पादकांना कमी लाभ, तर व्यापाऱ्यांना अधिक लाभ मिळतो. — वैशाली कोहपरे