navratri 2020

गोंदिया. कोरोना  संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षीचा नवरात्रौत्सव, दुर्गा पूजा व दसरा साध्या पध्दतीने साजरा करण्याबाबत २९ सप्टेंबरच्या शासन निर्णयान्वये मागदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. या सूचनांचे नागरिकांनी काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

सार्वजनिक नवरात्रौत्सवासाठी मंडळांनी नगर पालिका, ग्रामपंचायत, स्थानिकप्रशासन यांची त्यांचे धोरणानुसार यथोचित पुर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील. कोविड-१९ मुळे उदभलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता तसेच न्यायालयाने निर्गमित केलेले आदेश नगर पालिका, स्थानिक प्रशासनाचे मंडपांबाबतचे धोरण यांचेशी सुसंगत असे मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारण्यात यावेत.

या वर्षीचा नवरात्रौत्सव साध्या पध्दतीने साजरा करणे अपेक्षित असल्याने घरगुती तसेच सार्वजनिक देवीच्या मुर्तीची सजावट त्यानुषंगाने करण्यात यावी. देवीच्या मुर्तीची उंची सार्वजनिक मंडळांकरीता 4 फुट व घरगुती देवीच्या मुर्तीची उंची 2 फुटांच्या मर्यादेत असावी. या वर्षी शक्यतो पारपारीक देवीच्या मुतीऐवजी घरातील धातू, संगमरवर आदी मुर्तीचे पूजन करावे. मुर्ती शाडूची, पर्यावरण पूरक असल्यास तीचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे. विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास कृत्रिम विसर्जन स्थळी विसर्जन करण्यासंदर्भात प्रशासनाशी समन्वय ठेवावा. नवरात्रौत्सवाकरीता वर्गणी, देणगी स्वच्छेने दिल्यास स्विकार करावा.

जाहिरातीच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.  आरोग्य विषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती देण्यात यावी. तसेच माझे कुटुंब- माझी जबाबदारी या मोहिमेबाबत देखील जनजागृती करण्यात यावी. गरबा, दांडिया व इतर सांसकृतिक कार्यक्रम आयोजित करु नयेत. त्याऐवजी आरोग्य विषयक उपक्रम, रक्तदान शिबीर आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यु इत्यादी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय, स्वच्छता याबाबत जनजागृती करावी.

आरती, भजन,किर्तन व अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करतांना गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी.  ध्वनी प्रदुषणासंदर्भातील नियमांचे व तरतुदींचे पालन करण्यात यावे. देवीच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक इत्यादीद्वारे उपलब्ध करुन देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी. देवीच्या मंडपांमध्ये निर्जंतुकीकरणाची तसेच थर्मल स्क्रीनींगची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी. प्रत्यक्ष येऊन दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी शारीरीक अंतर तसेच स्वच्छतेचे नियम पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे.

देवीच्या आगमन व विसर्जन मिरवणूका काढण्यात येवू नयेत. ‍ विसर्जन स्थळी कमीत कमी वेळ थांबावे. लहान मुले आणि वरीष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जनस्थळी जाणे टाळावे. कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात यावी. स्थानिक प्रशासनाने गर्दी टाळण्यासाठी स्विकृती केंद्रांची व्यवस्था करावी. मंडपात 5 पेक्षा जास्त कार्यकर्त्यांची उपस्थिती नसावी आणि खाद्यपदार्थ अथवा पेय पानाची व्यवस्था करण्यास मनाई असेल. सार्वजनिक नवरात्रौत्सव प्रतिबंधीत क्षेत्रात असल्यास तर मुर्ती विसर्जन सार्वजनिक ठिकाणी करण्यास मनाई आहे.

दसऱ्याच्या दिवशी करण्यात येणारा रावण दहनाचा कार्यक्रम हा सर्व नियम पाळून प्रतिकात्मक स्वरुपाचा असावा. आवश्यक तेवढे व्यक्तीच कार्यक्रम स्थळी हजर राहतील. फेसबुक व इतर समाज माध्यमातून थेट प्रक्षेपणाद्वारे बघण्याची व्यवस्था करावी. देवीची मुती तलाव, नदीमध्ये विसर्जन करण्यात येवू नये. शासनाने दिलेल्या सुचनांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक राहील. नागरिकांनी सूचनांचे पालन करुन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.