प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

मागील वर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा उद्रेक होताच शासनाने बस वाहतूक बंद केली. त्यामुळे बस स्थानकातील दुकानेही बंद झाली. कोरोनाचे संकट वाढत राहिल्यामुळे काहींनी आपली दुकाने कायमस्वरूपी बंद केली.

    भंडारा (Bhandara).  मागीलवर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा उद्रेक होताच शासनाने बस वाहतूक बंद केली. त्यामुळे बस स्थानकातील दुकानेही बंद झाली. कोरोनाचे संकट वाढत राहिल्यामुळे काहींनी आपली दुकाने कायमस्वरूपी बंद केली; परंतु दुकान गाळे देताना परिवहन विभागाने जी अनामत रक्कम घेतली होती ती परत न दिल्यामुळे गाळेधारकांची पायपीट आजही सुरू आहे. परिवहन मंत्र्यांना पत्र लिहून गाळेधारक राकेश गजभिये यांनी व्यथा मांडली आहे.

    भंडारा बस स्थानक परिसरात 14 ते 15 दुकान गाळे आहेत. त्यातील एक गाळा गजभिये यांनी बुक स्टॉलसाठी भाड्याने घेतला होता. 2011 मध्ये हे गाळे घेताना अनामत म्हणून 56 हजार रूपये भरण्यात आले होते. तेव्हापासून 3,900 रूपये भाडे होते. दर चार वर्षांनंतर 10 टक्के वाढविण्यात आले. दरम्यान, मार्च महिन्यात कोरोनाचे संकट उद्भवले. त्यानंतर एसटी सेवा बंद पडली. दुकानाचे भाडे भरण्यापेक्षा दुकानच बंद करण्याचा निर्णय घेऊन गजभिये यांनी भंडारा बस स्थानकप्रमुखांना पत्र दिले. भंडारा आगाराने कोरोना काळातील सवलत देण्याचे तर सोडा. उलट 56 हजाराच्या रकमेतून केवळ 6 हजार रूपये देऊन फाईलबंद केली.

    गजभिये परिवहन विभागात पायपीट करीत आहेत. परंतु त्यांना अद्याप अनामत रक्कम मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांना निवेदन देऊन अनामत रक्कम परत देण्याची मागणी केली आहे.