बी-बियाणे सवलतीच्या दरात द्यावे; परिसरातील शेतकऱ्यांची मागणी

आगामी खरीप हंगाम अवघ्या एक महिन्यावर असून परिसरातील शेतकऱ्यांनी आतापासूनच शेतीची मशागत करायला सुरुवात केली आहे. पेरणीच्या वेळी धान बियाणे महाग होण्याची शक्यता आहे.

    धारगाव (Dhargaon).  आगामी खरीप हंगाम अवघ्या एक महिन्यावर असून परिसरातील शेतकऱ्यांनी आतापासूनच शेतीची मशागत करायला सुरुवात केली आहे. पेरणीच्या वेळी धान बियाणे महाग होण्याची शक्यता आहे. लॉकडाऊनची परिस्थिती लक्षात घेता राज्य शासन व कृषी विभागाने सवलतीच्या दरात धान, बी-बियाणे उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी परिरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

    मागीलवर्षी अवकाळी पाऊस, पूर, रोगराई यामुळे धानपिकाचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे खराब झालेले धान, बी-बियाणे यावर्षी बहुतांश शेतकऱ्यांनी पेरणीसाठी ठेवले नाहीत. महसूल विभागाने फक्त आकडेवारी फुगवून टाकलेली होती. मात्र, शेतकऱ्यांचा तर उत्पादन खर्च निघाला नव्हता.

    मागील वर्षी झालेली उत्पादनात घट व पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव यामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती खालावलेली आहे आणि त्यातच लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही. त्यामुळे शेतकऱ्यांकडे पैसा नाहीच, अशा परिस्थितीत धान्य खरेदीचा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे, दरम्यान, राज्य शासन व कृषी विभागाने शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात धानाचे बी-बियाणे द्यावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.