आष्टीत माकड जेरबंदीसाठी मोहीम; मर्कटलिलांनी नागरिक आणि शेतकरी हैराण

गोबरवाही गावात, शेतशिवारात माकडांनी उच्छाद मांडला. त्यांच्या मर्कटलिलांनी अक्षरश: जेरीस आलेल्या लोकांनी वनविभागाला माकडांचा बंदोबस्त लावण्याची मागणी केली. परंतु, त्यांनी कानाडोळा केल्याने अखेर लोकवर्गणी करून माकडांना पिंजऱ्यात बंद करण्याची तयारी सुरू झाली आहे.

    गोबरवाही (Gobarvahi).  गावात, शेतशिवारात माकडांनी उच्छाद मांडला. त्यांच्या मर्कटलिलांनी अक्षरश: जेरीस आलेल्या लोकांनी वनविभागाला माकडांचा बंदोबस्त लावण्याची मागणी केली. परंतु, त्यांनी कानाडोळा केल्याने अखेर लोकवर्गणी करून माकडांना पिंजऱ्यात बंद करण्याची तयारी सुरू झाली आहे. माकडांचा बंदोबस्त करणे ही वनविभागानी जबाबदारी होती. परंतु, त्यांच्या नाकर्तेपणामुळे हे काम शेतकरी आणि गावकऱ्यांना करावे लागत आहे.

    शेतातील पिक, भाजीपाला, कौलारू घरांचे माकडांच्या टोळीकडून नुकसान होत आहे. अखेर या प्रकाराने त्रस्त आष्टीतील गावकऱ्यांनी माकड पकडणारी समिती स्थापन केली. मागील 15 दिवसांपासून माकड पकडण्याची मोहीम सुरु आहे. यासाठी मजबूत पिंजरे बनविले आहेत. समतीचे अध्यक्ष माजी सरपंच अमृत सोनवाने आणि माजी उपसभापती शिशुपाल गौपाले यांच्या मार्गदर्शनात 21 सदस्यांच्या देखरेखीत ही मोहिम सुरु आहे.

    आतापर्यंत 60 माकडं पकडून दूर जंगलात सोडण्यात आले. 200 माकडे पकडण्याचा टारगेट ठेवण्यात आले आहे. संपूर्ण जिल्हा कोरोनाच्या संकटाला तोंड देत दहशतीत असताना या गावात मात्र, माकडाच्या भीतीने आणि नुकसानामुळे चक्क माकड पकडण्याची मोहीम राबविणे चर्चेचा विषय ठरला आहे.