गॅस दरवाढीने सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी; पुन्हा सरपणासाठी लाकडे गोळा करण्याचे काम सुरू

खाद्यतेलापासून ते किराणा साहित्य तर आता गॅसच्या वाढत्या किमतींनीही सर्वसामान्यांसह मध्यमवर्गीयांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. वर्षभरात दोनशे पंचवीस रुपयांनी सिलिंडर महागला असून, आता फक्त दहा रुपयांनी कपात करून गोरगरिबांचे कोणते इप्सित साध्य करणार, असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.

    भंडारा (Bhandara).  खाद्यतेलापासून ते किराणा साहित्य तर आता गॅसच्या वाढत्या किमतींनीही सर्वसामान्यांसह मध्यमवर्गीयांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. वर्षभरात दोनशे पंचवीस रुपयांनी सिलिंडर महागला असून, आता फक्त दहा रुपयांनी कपात करून गोरगरिबांचे कोणते इप्सित साध्य करणार, असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.

    जिल्ह्यात हजारो घरगुती गॅसधारक आहेत. महिन्याकाठी सिलिंडरची उचल केली जाते. उज्ज्वला योजनेंतर्गत शेकडो लाभार्थी आहेत; मात्र आता गॅसचे दर परवडण्यासारखे नसल्याने त्यांनी पुन्हा सरपणासाठी लाकडे गोळा करण्याचे काम सुरू केले आहे. मार्च महिन्यात 880 रुपयांनी घरगुती गॅस सिलिंडर मिळाला. अवघे 40 ते 45 रुपयांची सबसिडी त्यावर मिळत आहे. यावर गांभीर्याने उपाययोजना करावी, असे सर्वसामान्यांचे म्हणणे आहे.

    एक ते दीड वर्षात वीज, गॅस सबसिडीवर दोनशे ते साडेतीनशे रुपयांपर्यंत सबसिडी मिळायची. मात्र, आता 871 रुपयांना मिळणाऱ्या सिलिंडरवर फक्त 35 ते 45 रुपयांपर्यंत सबसिडी मिळत आहे. ही सबसिडी म्हणजे नावापुरतीच असल्याचे गॅस ग्राहकांचे म्हणणे आहे. ही सबसिडीही कशाला देता, असा उपरोधिक सवालही आता नागरिक विचारू लागले आहेत.

    कोरोना संकटकाळात जीवनावश्यक वस्तूंचे दर कमी होण्याऐवजी ते सातत्याने वाढत असल्याने गरिबांची फार पंचाईत झाली आहे. पाच महिन्यातील गॅस सिलिंडरच्या किमतीवर नजर घातल्यास नोव्हेंबर महिन्यात गॅस सिलिंडर 663 रुपयांत मिळत होता. त्यानंतर याच्या दरात सातत्याने वाढ होत गेली आहे. जवळपास दोनशे पंचवीस रुपयांची वाढ झाली आहे.