दोषी डॉक्टरांना सोडून कंत्राटी नर्सवर गुन्हा दाखल; कारवाईनंतर भाजपचा गंभीर आरोप

भंडाऱ्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत दहा नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाल्याच्या घटनेला ३९ दिवस उलटले. याप्रकरणी दोन कंत्राटी नर्सवर गुन्हा दाखल झाला आहे. कारवाईनंतर भाजपने गंभीर आरोप केलेत.

    भंडारा : भंडाऱ्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत दहा नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाल्याच्या घटनेला ३९ दिवस उलटले. याप्रकरणी दोन कंत्राटी नर्सवर गुन्हा दाखल झाला आहे. कारवाईनंतर भाजपने गंभीर आरोप केलेत.

    भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात ८ जानेवारीच्या मध्यरात्री नवजात मुलांच्या अतिदक्षता कक्षात लागलेल्या आगीत दहा नवजात बालकांचा मृत्यू झाला होता. या संदर्भात चौकशी समिती नेमली असून जिल्हा शल्य चिकित्सकांसह ७ लोकांवर निलंबनाची कार्यवाही करण्यात आली आहे.

    या संदर्भात ३९ दिवसानंतर एफआयआर दाखल करण्यात आली आहे. यात दोन कंत्राटी कर्मचारी स्मिता आंबीलढुके आणि शुभांगी साठवणे यांचा समावेश असून दोषी डॉक्टरांना मात्र वाचविण्यात आल्याचा आरोप पालकांकडून होत आहे .

    दरम्यान, भाजप खासदार मनोज कोटक यांनी देखील गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर निशाणा साधला आहे. १० मुलांच्या मृत्यूसाठी केवळ २ लोक जबाबदार कसे ? या घटनेत जबाबदार असेलल्यांना का वाचवलं जातय? असे सवाल त्यांनी केले आहेत. सरकारने तपासाच्या नावाखाली थट्टा केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.