गुढीपाडव्याचा सोनेरी मुहूर्त हुकणार; सराफा, इलेक्ट्रीकल्स, वाहनखरेदीला फटका

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या दिवशी सोने, वाहने व घरातील इतर मोठ्या वस्तू, प्लॉट, फ्लॅट खरेदी करण्याचा मुहूर्त साधला जातो. परंतु मागीलवर्षीप्रमाणे यंदाही त्यावर कोरोनावरील निर्बंधाने ग्रहण लागले आहे.

    भंडारा (Bhandara). साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या दिवशी सोने, वाहने व घरातील इतर मोठ्या वस्तू, प्लॉट, फ्लॅट खरेदी करण्याचा मुहूर्त साधला जातो. परंतु मागीलवर्षीप्रमाणे यंदाही त्यावर कोरोनावरील निर्बंधाने ग्रहण लागले आहे.

    राज्य शासनाने ‘ब्रेक द चेन’अंतर्गत 30 एप्रिलपर्यंत अत्यावश्यक सोडून सर्व प्रकारची दुकान बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यात ज्वेलरी शोरूम, वाहनांचे, फर्नीचर, इलेक्ट्रॉनिक वस्तूचे शोरूम बंद राहणार आहेत. त्यामुळे सोने व वाहन खरेदी करणाऱ्या ग्राहकांसह व्यापाऱ्यांचा हिरमोड झाला आहे. दरम्यान, रिअल इस्टेट क्षेत्रामधून ग्राहकांना घर खरेदीसाठी विलोभनीय ऑफर्सचा भडिमार सुरू झाला आहे.

    शहरातील मेन रोड व मोठा बाजार परिसरात सराफा बाजारपेठ आहे. मुळात गुढीपाडव्यादिवशी सोन्याचे दागिने हाती पडण्यासाठी किमान एक आठवडाआधी ऑर्डर देणे गरजेचे असते. परंतु, सोमवारपासून दुकाने बंद आहेत. यात बऱ्याच सराफा व्यापाऱ्यांची घरे दुकानाला लागूनच असल्याने ते घरूनही ऑर्डर पूर्ण करण्यासाठी कामाला लागले आहेत. परंतु, वाहन विक्रेत्यांना तसे करणे शक्य नाही. इलेक्ट्रॉनिक व फर्निचरवाले गोदामातून ग्राहकांना माल देवू शकतात. परंतु, दुकाने बंद असल्याने ग्राहकांचा प्रतिसाद मिळणे कठीण आहे.

    13 एप्रिलला गुढीपाडव्याचा मुहूर्त साधता यावा, म्हणून किमान सोमवारपासून दुकाने उघडण्यास परवानगी देण्याची मागणी होत आहे.

    उत्साहावर विरजण..
    लॉकडाऊननंतर सरकारने मुद्रांक शुल्कात दिलेल्या सवलतीमुळे घर खरेदीला चांगला प्रतिसाद मिळाला होता. 1 एप्रिलपासून सरकारने महिलांच्या नावे घर नोंदणी करताना मुद्रांक शुल्कात 1 टक्क्याची सवलत दिली आहे. गुढीपाडव्याला बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना भेटवस्तूसह घरखरेदीच्या किंमतीतही सवलत दिले जाते. ऑफर देवून गुढीपाडव्यानिमित्त ग्राहकांना आकर्षित केले जाते. यंदा मात्र, त्यावरही विरजण पडण्याची शक्यता आहे.