दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला; परीक्षांबाबत संभ्रम

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या दहावी, बारावीच्या परीक्षा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. सद्यस्थितीत कोरोनाचा वाढता संसर्ग व परीक्षा कशी होणार, याची चिंता लागल्याने परीक्षार्थ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.

  भंडारा (Bhandara). राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या दहावी, बारावीच्या परीक्षा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. सद्यस्थितीत कोरोनाचा वाढता संसर्ग व परीक्षा कशी होणार, याची चिंता लागल्याने परीक्षार्थ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.

  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य मंडळातर्फे बारावीची लेखी परीक्षा 23 एप्रिल ते 21 मे व दहावीची परीक्षा 29 एप्रिल ते 20 मे या कालावधीत होणार आहे. बारावीसाठी व दहावीसाठी लाखो विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. दहावीच्या प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षेचे स्वरूप बदलले असून काही सवलती देण्यात आल्या आहेत. राज्य मंडळाने परीक्षेच्या अनुषंगाने यापूर्वीच विशेष मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

  दहावी, बारावी परीक्षा नियोजित वेळेप्रमाणे होईल. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक नियमांची कडक अंमलबजावणी केली जाणार असल्याचे राज्य मंडळाचे अध्यक्ष यांनी नुकतेच जाहीर केले आहे. सद्यस्थितीत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण संख्या वाढत आहे. सध्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये दहावी, बारावी परीक्षेची घाई सुरू आहे. काही शाळांनी अभ्यासक्रम संपविला असून, प्रश्नपत्रिका संच सोडविण्यात येत आहेत. मात्र, परीक्षा ऑफलाइन कि ऑनलाईन होणार याबाबत संभ्रमावस्था कायम असल्याचे मुख्याध्यापकांनी सांगितले.

  ऑनलाइन परीक्षा घ्यायच्या तर नेटवर्क, संगणक या सर्व सुविधा ग्रामीण भागात उपलब्ध कशा करणार याचे उत्तर कोणाकडेच नाही. कोरोनाचा प्रभाव वाढल्याचे चित्र दिसत असले तरी छोट्या मोठ्या शहरातील गर्दीवर कोणतेच नियंत्रण नाही. रस्त्यांवर प्रचंड गर्दी दिसत आहे. ग्रामीण भागातील यात्रा बंद केल्या पण शहरातील आठवडी बाजार जोरात सुरू आहे. मग केवळ परीक्षा घेतल्या तर विद्यार्थ्यांनाच कोरोनाचा त्रास होणार आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

  सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह
  बोर्डाची परीक्षा शाळेतच होणार असल्याची घोषणा शिक्षण मंत्र्यांनी केली आहे. ज्या शाळेत वर्गखोल्या पुरेशा नसतील, तर शेजारच्या शाळेत परीक्षा घेण्याबाबत सूचना आहे. दहावी परीक्षा केवळ 24 दिवसांवर आली असली तरी अजूनही अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता या परीक्षा घेणे कितपत सुरक्षित आहे, याबाबत पालकांसह शिक्षण क्षेत्रातील अनेकांचे वेगवेगळे मतप्रवाह आहेत.

  नेमकी व्यवस्था काय?
  दहावी-बारावीची परीक्षा त्याच शाळेत होणार असल्याने परीक्षेची अंमलबजावणी किती कडक राहणार? दरवर्षी भरारी पथके नेमून कॉपीला आळा घालण्यासाठी अनेक प्रयत्न होतात, पण आता यासाठी कोणत्या उपाययोजना करणार, प्रत्येक शाळेत बैठे पथक नेमणे मंडळाला शक्य आहे का, असे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत.