प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

मोहाडी तालुक्याचे ठिकाण असताना सुद्धा अजून पर्यंत येथे कोविड केअर सेंटर, किंवा कोविड आयसोलेशन केंद्र तयार करण्यात आले नसल्याने आश्चर्य होत आहे. मागील वर्षीपेक्षा यावर्षी कोरोनाने महामारीचे रूप घेतले आहे.

    मोहाडी (Mohadi).  तालुक्याचे ठिकाण असताना सुद्धा अजून पर्यंत येथे कोविड केअर सेंटर, किंवा कोविड आयसोलेशन केंद्र तयार करण्यात आले नसल्याने आश्चर्य होत आहे. मागील वर्षीपेक्षा यावर्षी कोरोनाने महामारीचे रूप घेतले आहे. मोहाडी हे तालुक्याचे ठिकाण असून सुद्धा आतापर्यंत मोहाडी येथे कोविड केअर सेंटर, किंवा आयसोलेशन केंद्र उघडण्यात आलेले नाही.

    कोरोना पॉझिटिव्ह आलेल्यांना होम आयसोलेशन केले जाते, त्यापैकी काही गंभीर स्वरूपाचे असतात. होम आयसोलेशन असणारे काही बिनधास्त सुपर स्प्रेडर बनून शहरात फिरत असतात, त्यामुळे धोका वाढलेला असून याची तक्रारसुद्धा अनेक वेळा नगरपंचायतीला करण्यात आली आहे. हेच नाही तर कोविड चाचणी केंद्रात कोणत्याच सोयी, सुविधा नाहीत, लोक उन्हात उभे राहून कोरोना चाचणी करीत आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी मोहाडी शहरासह तालुक्यात कोरोना संक्रमितांची संख्या चार पटीने वाढली आहे.

    अनेक जण कोरोना चाचणी न करता ताप, सर्दीसाठी येथील डॉक्टरांकडे रांगा लावत आहेत. येथील काही डॉक्टरांची ओपीडी दररोज हाऊसफुल्ल चालू आहे, रोग आटोक्यात आला तर ठीक नाहीतर त्याला नंतर मोठ्या रुग्णालयात जाण्यासाठी सांगितले जाते. तोपर्यंत त्याचा ऑक्सिजन लेव्हल कमी झालेली असते, मग त्या रुग्णाचे नातेवाईक त्याला वेगवेगळ्या डॉक्टरकडे घेऊन जात असल्याचे चित्र आहे. व नंतर तो रुग्ण ऑक्सिजन कमी झाल्याने दगावल्याचे माहीत होते. न भूतो, न भविष्य तो इतके व्यक्ती मोहाडी शहरातील व परिसरातील मृत्यू पावत आहेत.

    ग्रामीण रुग्णालय रिकामे
    मोहाडी येथे 30 ते 40 खाटांचे सुसज्ज ग्रामीण रुग्णालय आहे. एकीकडे खासगी डॉक्टरांच्या दवाखान्यात रुग्णांच्या रांगा लागलेल्या आहेत, तर दुसरीकडे ग्रामीण रुग्णालयातील सर्व बेड रिकामे पडलेले आहेत. याचे कारण न समजण्यापलीकडे आहे. अगोदर याच ग्रामीण रुग्णालयात साथीचे रोग आल्यावर बेड मिळत नव्हते, परंतु आता टायफाईड, न्यूमोनिया, ताप, खोकला असणाऱ्यांची संख्या खूप जास्त असताना सुद्धा रुग्ण ग्रामीण रुग्णालयाकडे न भटकण्याचे कारण गुलदस्त्यात आहे.