जिल्ह्यात दुकानांचे शटर झाले डाऊन; लॉकडाउन बाबत व्यापारी व्दिधा मन:स्थितीत

भंडारा जिल्ह्यात अखेर नाही हो म्हणता, म्हणता जीवनावश्यक साहित्यांची दुकाने वगळता इतर सर्व प्रकारच्या दुकानांचे शटर आज डाऊन झाले. तब्बल 30 एप्रिलपर्यंत व्यवसाय बंद राहणार असल्याने व्यापारीवर्गात तीव्र नाराजी व संतापाचे वातावरण होते.

  भंडारा (Bhandara).  अखेर नाही हो म्हणता, म्हणता जीवनावश्यक साहित्यांची दुकाने वगळता इतर सर्व प्रकारच्या दुकानांचे शटर आज डाऊन झाले. तब्बल 30 एप्रिलपर्यंत व्यवसाय बंद राहणार असल्याने व्यापारीवर्गात तीव्र नाराजी व संतापाचे वातावरण होते. परंतु, राज्यसरकारच्या निर्णयाचा आदर ठेवीत स्थानिक प्रशासनाला सहकार्य करण्याची भूमिका घेत भंडारासह तुमसर, मोहाडी, पवनी, लाखांदूर, साकोली, लाखनी येथे शासनाने निर्देशित केलेली दुकाने बंद ठेवण्यात आली.

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विकेंडला दोन दिवस लॉकडाउनची घोषणा सुरूवातीला केली होती. त्यानंतर उशिरा ब्रेक द चेन अंतर्गत नवे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त झाले. परंतु, जिवनावश्यक साहित्यांची दुकाने सोडून इतर सर्व प्रकारची दुकाने पुढील निर्णयापर्यंत बंद राहतील, याबाबत नगरपालिका व जिल्हा प्रशासनाने आपली भूमिका स्पष्ट केली नव्हती. त्यामुळे आज सकाळी नेहमीच्या वेळेवर शहरातील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने उघडली होती. हीच परिस्थिती जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या बाबतीत होती. मात्र, व्यापाऱ्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयात संपर्क साधून याबाबतची भूमिका स्पष्ट करून घेतली.

  व्यापारी प्रशासन आमने सामने…
  सकाळी नेहमीच्या वेळेवर व्यापारी आपली दुकाने उघडण्यासाठी गेले होते. अनेकांना या निर्णयाबाबद संभ्रम होताच. यावेळी नगरपालिकेचे कर्मचारी आणि पोलिस यांनी शहरात फिरून सवलत मिळालेली प्रतिष्ठाने सोडून इतर दुकाने बंद करण्याची सक्ती केली. त्यामुळे व्यापाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली. यावेळी पोलिस आणि व्यापाऱ्यांत शाब्दीक चकामक उडाली होती. काही व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेवून या निर्णयाचा निषेध करीत लॉकडाउन मागे घेण्याची मागणी केली.

  विरोध आणि समर्थनही
  कठोर निर्बंधांच्या नावाखाली सरकारने लॉकडाऊन पुकारल्याचा आरोप करत या निर्णयाविरोधात सर्वसामान्य दुकान चालक व व्यापारी संघटनांनी निषेध नोंदविला. एकीकडे जीवनावश्यक वस्तू नसल्याने दुकाने बंद करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. मात्र ई-कॉमर्सच्या नावाखाली त्याच वस्तू ऑनलाईन पुरवठादारांना पोहचवण्यास परवानगी दिलेली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरेानाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने धास्ती व दहशत आहे. त्यामुळे लॉकडाउनला विरोध होत असलातरी कोरोना प्रादुर्भावामुळे परिस्थिती हाताबाहेर जावू नये, असेही वाटत असल्याने नाईलाजास्तव प्रशासनाच्या आदेशाची अंमलबजावणी केली जात आहे.