प्रायोगिक शेतीतून समृद्धीकडे वाटचाल; शेतीनिष्ठ पुरस्काराने होणार गौरव

शेती आणि निसर्गाचे विळ्या-भोपळ्याचे नाते. दरवर्षी नैसर्गिक प्रकोपाचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीतही परिश्रमातून साकोली तालुक्यातील किन्ही मोखे येथील शेतकऱ्याने समृद्धीचा मळा फुलविला. त्यांच्या या परिश्रमावर शासनाची मोहर लागली. घनश्याम बळीराम पारधी यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार घोषित झाला.

    भंडारा (Bhandara).  शेती आणि निसर्गाचे विळ्या-भोपळ्याचे नाते. दरवर्षी नैसर्गिक प्रकोपाचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीतही परिश्रमातून साकोली तालुक्यातील किन्ही मोखे येथील शेतकऱ्याने समृद्धीचा मळा फुलविला. त्यांच्या या परिश्रमावर शासनाची मोहर लागली. घनश्याम बळीराम पारधी यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार घोषित झाला.

    साकोली तालुक्यातील किन्ही मोखे गाव शेतीवर अवलंबून. याच गावात एक अल्पभूधारक शेतकरी नवनवीन प्रयोग करून आपल्यासोबत इतर शेतकऱ्यांनाही मार्गदर्शन करीत आहे. घनश्याम पारधी असे या शेतकऱ्याचे नाव आहे. शालेय जीवनात पितृछत्र हरपल्याने त्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी आली. आपसूकच शेती कसण्याशिवाय त्यांच्यापुढे पर्याय नव्हता. 1997-98 पासून त्यांनी शेती कसणे सुरू केली. सुरुवातीपासूनच परिश्रमाची जोड देत त्यांनी आपल्या शेतीत नवनवीन प्रयोग केले. 1998 साली मिलिंद ढोणे या कृषी सहायकांशी त्यांची गाठ पडली आणि तेथून सुरू झाली आधुनिक तंत्रज्ञानाने शेती कसण्याची पद्धत.

    शेतकरी प्रशिक्षण, नवनवीन ज्ञान मिळविण्याची आवड यातून त्यांनी शेतीचे चित्रच पालटले. अवघ्या साडेचार एकर शेतीत त्यांनी हे सर्व प्रयोग केले. आधुनिक तंत्रज्ञानासोबतच विषमुक्त शेती पिकविण्याचा ध्यास घनश्याम पारधी यांनी घेतला. आजही ते अडीच एकर शेतीत सेंद्रिय पद्धतीनेच धान पिकवितात. बीबीएफ पद्धतीचा अवलंब करून त्यातून एकरी 12 ते 14 क्विंटल धानाचे उत्पन्न काढतात. विशेष म्हणजे या विषमुक्त धानाला इतर शेतकऱ्यांपेक्षा अधिक दर मिळतो. जय श्रीराम जातीच्या धानाला साधारणत: 40 ते 45 रुपये दर मिळत असल्याचे घनश्याम पारधी सांगतात.

    धानासोबतच त्यांनी विषमुक्त भाजीपाल्याचा प्रयोगही आपल्या शेतात सुरू केला. बोर वृक्षाची लागवड केली. त्यातूनही त्यांना उत्पन्न मिळत आहे. या सर्वांमध्ये त्यांना कृषी विभागाचे मिळालेले मार्गदर्शन बहुमूल्य ठरले. साकोली कृषी अधिकारी वृषाली देशमुख, तालुका कृषी अधिकारी सागर ढवळे, कृषी सहायक परशुरामकर, स्मिता मोहरकर, कृषी मंडळ अधिकारी मेश्राम आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन करीत असल्याचे ते विनम्रपणे सांगतात. अशा या शेतकऱ्याचा महाराष्ट्र शासनाने गौरव केला असून, त्यांना 2019 सालचा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार घोषित झाला आहे.

    शेतकऱ्यांना विनामूल्य मार्गदर्शन
    घनश्याम पारधी यांनी शेतीत केलेले नवनवीन प्रयोग आपल्यापुरतेच मर्यादित न ठेवता इतर शेतकऱ्यांनाही त्यात सहभागी करून घेतले. शेतकऱ्यांना विनामूल्य मार्गदर्शन करण्यासाठी ते नेहमी तत्पर असतात. शेती विषयातील नवनवीन ज्ञान आत्मसात करून ते आपल्या सहकारी शेतकऱ्यांना सांगतात. इतरही शेतकरी त्यांचा आदर्श घेत शेती करीत आहेत.

    आधुनिक पद्धतीने शेती करीत आहेत. दहा वर्षांपासून शेती कसत आहे. रासायनिक खतांचा अतिरेक कमी करून विषमुक्त पीक घेतले जात आहे. भविष्यात परिसरातील शेतकऱ्यांना एकत्रित करून मोठ्या प्रमाणात विषमुक्त पीक पिकविले जाईल. हा माल परराज्यात विक्रीसाठी पाठविण्याचा प्रयत्न आहे.  —  घनश्याम पारधी, शेतकरी किन्ही (मोखे).