वाघाच्या तीन बछड्यांचा कालव्याच्या विहिरीत मृत्यू; अस्वलही दगावले, लागोपाठच्या घटनांमुळे वनविभाग हादरला

वाघिणीचे पाय तोडून तिच्या अन्य अवयवांची तस्करीची घटना अजूनही तपासात असताना गेल्या दोन दिवसांत विदर्भात वाघाच्या तीन बछड्यांसह एका बिबट्याचा झालेला मृत्यू गाढ झोपलेल्या वन विभागाला खडबडून जागे करणारा आहे. विशेष म्हणजे, वनमंत्र्याचा पदभार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे असतानाही लागोपाठ अशा घटना घडत असल्याने अधिकाऱ्यांवर वचक नसल्याचेच वनविभागात बोलले जात आहे. अवघ्या दोन ते तीन महिन्यांचे हे दोन बछडे होते, तर यापूर्वी ठार केलेली वाघीण चार बछड्यांची गर्भवती होती. यासोबतच बुधवारी एका अस्वलाचाही मृत्यू झाल्याने या घटनांमध्ये घातपाताचा संशय आणि तस्करांची टोळी असल्याचे अंदाज व्यक्त होत आहे.

  भंडारा : वाघिणीचे पाय तोडून तिच्या अन्य अवयवांची तस्करीची घटना अजूनही तपासात असताना गेल्या दोन दिवसांत विदर्भात वाघाच्या तीन बछड्यांसह एका बिबट्याचा झालेला मृत्यू गाढ झोपलेल्या वन विभागाला खडबडून जागे करणारा आहे. विशेष म्हणजे, वनमंत्र्याचा पदभार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे असतानाही लागोपाठ अशा घटना घडत असल्याने अधिकाऱ्यांवर वचक नसल्याचेच वनविभागात बोलले जात आहे. अवघ्या दोन ते तीन महिन्यांचे हे दोन बछडे होते, तर यापूर्वी ठार केलेली वाघीण चार बछड्यांची गर्भवती होती. यासोबतच बुधवारी एका अस्वलाचाही मृत्यू झाल्याने या घटनांमध्ये घातपाताचा संशय आणि तस्करांची टोळी असल्याचे अंदाज व्यक्त होत आहे.

  बुधवारी पहाटे गराडा बु. येथे वाघाच्या दोन बछड्यांचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. काही तासांतच वाघिणीपासून दुरावलेल्या नवजात बछड्याचाही दुर्दैवी अंत झाल्याची दुसरी घटना पवनी वनपरिक्षेत्र अंतर्गत गुडेगाव बीट येथे उघडकीस आली, तर रावणवाडीच्या जंगलात नर अस्वल मृतावस्थेत आढळून आले. एकाच दिवशी घडलेल्या या दुर्दैवी घटनांमुळे वन्यजीवप्रेमीत हळहळ व्यक्त होत आहे.

  समतल विहिरीने केला घात

  तालुक्यातील गराडानजीक टेकेपार उपसा सिंचन प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या कालव्याच्या विहिरीत मृत आढळलेले दोन्ही बछडे मादी असून, ते 2 महिन्यांचे होते. पहाटे युवकांना ते मृतावस्थेत दिसले. वनक्षेत्र अधिकारी विवेक राजूरकर यांच्यासह वन विभागाची चमूंनी दोन्ही बछड्यांना बाहेर काढले. घटनास्थळी दोन्ही मृत बछड्यांजवळच वाघिणीच्या पाऊलखुणा दिसून आल्याने त्यांची आई जवळच असल्याचा अंदाज आहे.

  मातेने दुरावल्याने सोडले प्राण

  पवनी वन परिक्षेत्र अंतर्गत गुडेगाव बीटमध्ये एका वाघिणीने दोड बछड्यांना जन्म दिला. त्यापैकी एकाला तिने जंगलात सोडून दिले. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्या बछड्याचा सांभाळ करीत वाघिणीने सोडलेल्या ठिकाणीच बछड्याची भेट होईल, या आशेने ठेवले. संपूर्ण घटनाक्रमावर वन विभाग उपसंरक्षक नजर ठेवून होते. मात्र सकाळपर्यंत वाघीण आलीच नाही व त्या एकट्या नवजात बछड्याचा मृत्यू झाला.

  अस्वल आढळले मृतावस्थेत

  दुसरीकडे बीट गार्ड फुलसुंगे गस्तीवर असतांना त्यांना भंडारा वन विभागांतर्गत खापा राऊंडच्या कक्ष क्रमांक 286 मध्ये नर अस्वल रपट्याच्या बाजूला मृतावस्थेत आढळून आले. त्याच्या मृत्यूचे नेमके कारण कळले नसून तपास सुरू आहे.
  यापूर्वी यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा वनपरिक्षेत्रात गर्भवती वाघिणीची शिकार करण्यात आली होती. ११ मे रोजी गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील सिंधीपार येथेही बिबट्यावर विषप्रयोग करून शिकार करण्यात आली होती.