खरीप हंगामात वापरा घरगुती बियाणे; दरवर्षी बियाणे बदलाची आवश्यकता नाही

येत्या खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांनी स्वतःच्या घरी असलेली सोयाबीन बियाण्यांची उगवण क्षमता तपासूनच पेरणीसाठी वापरावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले यांनी केले आहे.

  भंडारा (Bhandara).  येत्या खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांनी स्वतःच्या घरी असलेली सोयाबीन बियाण्यांची उगवण क्षमता तपासूनच पेरणीसाठी वापरावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले यांनी केले आहे. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बाजारात सद्यस्थितीत सोयाबीन भाव वाढले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी दरवर्षी बियाणे बदलाची आवश्यकता नाही.

  एकदा प्रमाणित बियाणे वापरल्यानंतर त्याच्या उत्पादनातून येणारे बियाणे पुढील दोन वर्षांपर्यंत वापरता येतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी स्वतःकडे खरीप हंगामातील राखून ठेवलेल्या घरातीलच सोयाबीन बियाण्यांचा वापर कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली करावा, असा सल्ला कोटांगले यांनी दिला आहे.

  कोरोना संसर्गाचा फटका सर्वच व्यवसायांना बसल्याने महागाईत वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी स्वतःकडील बियाणे वापरल्यास उत्पादन खर्च कमी होईल. प्रमाणित बियाण्यांच्या उत्पादनातून प्रतवारी करून चांगल्या प्रतीच्या सोयाबीनची बियाणे म्हणून निवड करावी.

  बियाणे निवडताना घ्या काळजी
  सोयाबीनचे बियाणे अत्यंत नाजूक असते, त्याचे बाह्य आवरण पातळ असल्याने त्याची उगवण क्षमता अबाधित राखण्यासाठी बियाणे हाताळताना शेतकऱ्यांनी कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, कृषी मंडल अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य ती काळजी घ्यावी. बियाण्याची साठवणूक करताना आर्द्रतेचे प्रमाण 10 ते 12 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त नसल्याची खात्री करावी.

  साठवणूक करताना प्लास्टिक पोत्यांचा वापर टाळावा, त्याऐवजी गोणपाटाची पोती वापरणे आवश्यक आहे. पोत्यांची थप्पी सात फुटांपेक्षा जास्त उंच राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. घरच्याच बियाण्याची उगवणशक्ती तपासण्याचे आवाहन भंडारा तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले यांनी तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना केले आहे.