वन्यप्राण्यांचा शेतशिवारात धुडगूस; रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान

सिहोरा-बपेरा परिसरात जंगलव्याप्त गावाशेजारी असलेल्या शेतीत वन्यप्राणी शिरकाव करून पिकांचा फडसा पाडत आहेत. या उपद्रवामुळे शेतकरी हैराण झाले आहेत.

  सिहोरा (Sihora).  सिहोरा-बपेरा परिसरात जंगलव्याप्त गावाशेजारी असलेल्या शेतीत वन्यप्राणी शिरकाव करून पिकांचा फडसा पाडत आहेत. या उपद्रवामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. विशेष म्हणजे नुकसानाचा पंचनामा करूनही मोबदला देण्यात वनविभागाकडून दिरंगाई केली जात आहे.

  सध्या उन्हाळी धान शेतात उभे आहे. याशिवाय भाजीपाला व इतर पीक आहेत. सिंचनसुविधेमुळे शेतकरी शेतात टरबूज, काकड्या, शेंगा, ढेमसे आदी फळभाज्यांचे उत्पादन घेतात. परंतु वन्यप्राण्यांच्या उपद्रवाने पिकांचे प्रचंड नुकसान सोसण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. रानडुक्कर, हरीण यासारखे प्राणी पिकांचे नुकसान करतात. पिकांची मुळे पोखरून काढत असल्याने अतोनात नुकसान सोसावे लागत आहे. शेतशिवारातुन वन्यप्राण्यांना हाकलून लावण्यासाठी शेतकरी अनेक उपाययोजना करीत असले तरी यात ते यशस्वी होताना दिसत नाहीत. वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकरी वनविभागाला वारंवार सूचना देत आहेत. परंतु युद्धस्तरावर वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना करण्यात येत नाहीत.

  मानव, वन्यप्राणी संघर्ष
  शेत शिवार संरक्षित करण्यासाठी महत्त्वाकांक्षी योजना नाही. वन्यप्राण्यांचे कायमस्वरूपी बंदोबस्त करता येत नाहीत. यामुळे वन्यप्राणी आणि शेतकरी असा संघर्ष होताना दिसत आहे. वन्यप्राण्यांची हत्या करण्यासाठी खाद्यपदार्थात स्फोटकांचे मिसळून रानडुक्कर मारले जातात. या वन्यप्राण्यांची माहिती वन विभागाला देण्यात येत नाही. दरम्यान पिकांचे नुकसान झाल्यानंतर वन विभागाची यंत्रणा सर्वेक्षण करीत आहेत. परंतु आर्थिक मदत आखडती असल्याने शेतकरी नाराज झाले आहेत. सर्व्हेक्षणाच्या आधारावर देण्यात येणारी आर्थिक मदत तोडकी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही. नुकसानभरपाईचा आकडा ओलांडत नाही. नुकसान हजारो रुपयांचे घरात असताना शेकडोची मदत शेतकऱ्यांना दिली जात आहे.

  शेकडो प्रस्ताव कागदावर
  जंगलव्याप्त गावांलगतचे शेतकरी वन्यप्राण्यांच्या उपद्रवाने हतबल झाले आहेत. धान पुंजण्याची नासाडी रानडुक्कर करीत असल्याचे अनेक प्रकरणे वन विभागाच्या दालनात दरवर्षी सादर करण्यात येत आहेत. परंतु आर्थिक मदत दिली जात नाही. नुकसान भरपाई देताना सरसकट आर्थिक मदत देण्याची मागणी भाजपचे युवा नेते किशोर रहांगडाले, भाजपा किसान आघाडीचे तालुकाध्यक्ष सुभाष बोरकर, भाजयुमोचे विनोद पटले, ग्राम पंचायत सदस्य शितल चिंचखेडे, सामाजिक कार्यकर्ते सतीश सोनवणे, योगराज टेंभरे, सरपंच सुषमा पारधी, सरपंच उर्मिला लांजे, सरपंच वैशाली पटले, सरपंच नेजनबाई गायधने यांनी केली आहे.