बिहारमध्ये २० वर्षांनंतर भाजपाचे वर्चस्व, नितीशकुमारांवरही केली मात, राज्यातील सर्वात मोठा पक्ष होण्याच्या मार्गावर

सध्याचा कल लक्षात घेता भाजपाला ७० ते ८० जागा मिळण्याची शक्यता आहे, २०१५ साली हाच आकडा ५३ च्या घरात होता. नितीशकुमारांच्या जेडीयूला २० ते २५ जागांचे नुकसान होताना दिसते आहे, त्यांना ४५ ते ५० जागा मिळतील असा सध्याचा अंदाज आहे.

  •  भाजपाला २० पेक्षा जास्त जागांचा फायदा, तर जेडीयूला २१ पेक्षा जास्त जागांचे नुकसान

नवी दिल्ली. बिहार निवडणुकांची मतमोजणी सुरु आहे. राज्यात जेडीयू-भाजपा यांची एनडीए सतिसऱ्यांदा सत्ता स्थापन करतील, याची शक्यता आहे. मात्र या निवडणुकीत भाजपा, नितीशकुमारांपेक्षा वरचढ झाल्याचे दिसते आहे. भाजपाला २०१५ पेक्षाही जास्त जागा मिळतील, असे सध्या तरी दिसते आहे. सध्याचा कल लक्षात घेता भाजपाला ७० ते ८० जागा मिळण्याची शक्यता आहे, २०१५ साली हाच आकडा ५३ च्या घरात होता. नितीशकुमारांच्या जेडीयूला २० ते २५ जागांचे नुकसान होताना दिसते आहे, त्यांना ४५ ते ५० जागा मिळतील असा सध्याचा अंदाज आहे.

या निकालांच्या परिणामांमुळे बिहारमधील नंतरचे राजकारण मोठ्या प्रमाणात बदलण्याची शक्यता आहे. आत्तापर्यंत असलेला मोठा भाऊ म्हणजेच नितीशकुमार आता लहान भाऊ होण्याची शक्यता आहे. दोन्ही पक्षांचे राजकारणातील स्थान आणि मान यावर या निकालांचा परिणाम होणार आहे. या निकालांपर्यंत मोठ्या भावाच्या भूमिकेत असलेल्या जेडीयूला लहान भावाच्या भूमिकेत एडजस्ट व्हावे लागणार आहे. निवडणुकांपूर्वी तिकिट वाटपातही जेडीयूच वरचढ ठरली होती. भाजपाने केंद्राचे राजकारण करावे आणि बिहारचे राजकारण आम्ही करु, या नितीशकुमारांच्या भूमिकेत मोठा बदल पाहायला मिळणार आहे.

भाजपाचा लहान भावापासून मोठ्या भावापर्यंतच्या या प्रवासाला २० वर्षांचा कालावधी जावा लागला आहे. यापूर्वी काही निवडणुकांत भाजपाला जेडीयूपेक्षा जास्त जागा मिळाल्या होत्या, मात्र जेडीयूने नेहमीच भाजपाला लहान भआऊ मानले होते.

बिहारमधील एनडीएचा प्रवास
गेल्या २० वर्षांत चार वेळा भाजपाच्या पाठिंब्यावर नितीशकुमार मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. पण नेहमीच त्यांनी भाजपाला दुय्यम वागणूक दिली.

सन २००० – भाजपाच्या समर्थनाने जेडीयूतर्फे नितीशकुमारांनी पहिल्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली खरी, पण हे सरकार केवळ सात दिवसच टिकू शकले.

सन २००५ – १३ व्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले. एनडीएला ९२ जागा मिळाल्या, भाजपाला ३७, जेडीयूला ५५ जागा मिळाल्या, कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही, त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली.

२००५- सहा महिन्यानंतर राज्यात पुन्हा निवडणुका पार पडल्या, एनडेला यावेळी १४३ जागा मिळाल्या. जेडीयूचे ८८ तर भाजपाचे ५५ आमदार निवडून आले. नितीशकुमार मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले.

२०१०- एनडीएला २४३ पैकी २०६ जागा मिळाल्या, प्रचंड बहुमताने सरकार अस्तित्वात आले. जेडीयूला ११५ तर भाजपाला ९१ जागा मिळाल्या. नितीशकुमारांचा मान वाढला, या वेळेपासूनच जेडीयू राज्यात स्वताला भाजपाचा मोठा भाऊ म्हणवून घेऊ लागली. याच मानापमान नाट्यात २०१४ च्या लोकसभा निवडणुकीवेळी जेडीयूने एनडीएपासून वेगळी भूमिका घेतली.

२०१० साली भाजपाला मिळालेल्या जागांची टक्केवारी ही जेडीयूपेक्षा चांगली होती. जेडीयू १४१ जागा लढली होती, त्यात त्यांना ११५ जागा मिळाल्या होत्या, तर भाजपाला १०२ जागा मिळाल्या होत्या, त्यात ९१ जागी भाजपा जिंकली होती, भाजपाची विजयाची टक्केवारी कमी जागा लढूनही जेडीयूपेक्षा चांगली होती.

२०१५- जेडीयू आणि भाजपाने वेगवेगळ्या निवडणुका लढविल्या. यात जेडीयू-राजद-काँग्रेस महाआघाडीला १२६ जागा मिळाल्या. यात जेडीयूला ७१ तर राजदला ८० जागा मिळाल्या.
भाजपाला ५३ जागा मिळाल्या. या महाआघाडी तीन वर्षांतच फूट पडली.

२०२०- या विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि जेडीयूने ५०-५० फॉर्म्युल्यावर निवडणुका लढविल्या. जेडीयूला एक जास्त १२२ जत भाजपाला १२१ जागांवर नमते घ्यावे लागले. यात भाजपाचे अन्य घटक पक्षही सामील होते. प्रत्येक वेळी मोठा भाऊ म्हणवत जेडीयूने नेहमीच भआजपापेक्षा जास्त जागांवर निवडणुका लढविल्या.

गेल्या चार लोकसभा निवडणुकांत बिहारमधील एनडीएला ट्रॅक रेकॉर्ड

२००४ साली जेडीयूला ६ तर भाजपाला २ जागा
या निवडणुकीत जेडीयू आणि भाजपाने ७०-३० फॉर्म्युल्यावर निवडणुका लढविल्या. जेडीयूने २६ जागा तर भाजपाने १४ जागा लढविल्या. यात जेडीयूला ६ तर भाजपाला २ जागा मिळाल्या

• २००९ साली जेडीयूला २० तर भाजपाला १२ जागा
• २००९ साली जेडीयू आणि भाजपाने एकत्र निवडमुका लढविल्या. जेडीयूने २५ जागा लढविल्या त्यात २० जागा मिळाल्या, तर भाजपाने १५ जागा लढविल्यात त्यात १२ जागा मिळाल्या.

• २०१४ साली जेडीयूला ४० पैकी फक्त २ जागा मिळाल्या.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत नितीशकुमार एनडीएसोबत लढले नाहीत. एकट्याच्या बळावर निवडणुका लढल्या. एनडीएत भाजपा, रालोसपा आणि लोजपा यांचा समावेश होता. भाजपा २९, लोजपा ७ आणि रालोसपा ४ जागांवर लढले. भाजपाने २९ पैकी २२ जागा जिंकल्या

• २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाची कामगिरी उत्तम
२०१९ लोकसभा निवडणुकीत भाजपा आणि जेडीयू १७-१७ जागा तर लोजपाने ६ जागा लढविल्या होत्या. भाजपाने सर्व १७ जागा जिंकल्या, तर जेडीयूला १६ जागा मिळाल्या होत्या. लोजपाने सहाच्या सहा जागा जिंकल्या.