How to become CM by winning 40 seats? RJD leaders question Nitish Kumar

दिल्ली : बिहारच्या विधानसभा निवडणुकीचा (bihar election) निकाल रालोआच्या बाजूने लागला आहे. मात्र, त्यावरून सुरू झालेला वाद अद्याप शमलेला नाही. अवघ्या 40 जागा जिंकल्या असताना त्या जोरावर नितीशकुमार (nitish kumar) बिहारचे मुख्यमंत्री कसे काय होऊ शकतात? असा प्रश्न राजदचे नेते मनोजकुमार झा(RJD leader Manoj Jha) यांनी उपस्थित केला आहे.

मतदारांनी दिलेला कौल हा नितीशकुमार यांच्या विरोधात आहे. त्यांनी याबाबत आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. बिहारची जनता लवकरच दुसरा पर्याय शोधू शकते. कदाचित आठवडाभरात, कदाचित दहा दिवसात किंवा कदाचित महिनाभरात बदल घडेल, असेही झा यांनी म्हणाले.

रालोआ आमदारांच्या रविवारी झालेल्या बैठकीत नितीशकुमार यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा नितीशकुमार हेच मुख्यमंत्री होणार हे निश्चित झाले आहे. दरम्यान, राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि राज्यसभा खासदार मनोज झा यांनीही यावरून नितीशकुमार यांच्याच्यावर टीका केली आहे. नितीशकुमार 40 जागा जिंकून मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न पाहत आहेत, खरंच जनता मालक आहे, असेही झा म्हणाले.

राजदला अजूनही पडताहे सत्तेची स्वप्ने

नितीशकुमार यांना नाराज न करण्याचा निर्णय भाजपने घेतल्याचे चित्र सध्या स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे नितीशकुमार यांच्या नाराजीचा फायदा घेण्याच्या राजदच्या प्रयत्नांना यश येण्याची शक्यता सध्या तरी दिसत नाही. मात्र, राजकारणात नवी समीकरणे कधीही जुळू शकतात, हे गेल्या काही वर्षांतील घडामोडींवरून अनेकदा दिसून आले आहे. बिहारमध्ये सरकार स्थापन होऊन बहुमत सिद्ध होईपर्यंत सत्तेचे हे खेळ सुरूच राहण्याची शक्यता आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत रालोआला बहुमत मिळाले असले तरी राष्ट्रीय जनता दल (राजद) हा पक्ष सर्वाधिक जागा जिंकून एक नंबरचा पक्ष ठरला आहे. बिहार विधानसभेत एनडीएची सत्ता पुन्हा येणार, हे निकालानंतर स्पष्ट झाले आहे. मात्र, तरीही रालोआला मिळालेले बहुमत हे काठावरचे आहे. 243 जागांपैकी राष्ट्रीय जनता दलाला सर्वाधिक 75 जागांवर विजय मिळाला आहे. तर त्याखालोखाल भाजपला 74 आणि जेडीयुला 43 जागा मिळाल्या आहेत. यामुळे भविष्यात इतर लहान पक्षांना सोबत घेऊन सत्ता स्थापन करण्याचे स्वप्न अजूनही राजद नेत्यांना पडत आहे.