हार कर जीतने वालों को ‘बाजीगर’ कहते है…

'बाजीगर' एक जणू ॲसिड टेस्ट होता म्हणायचे का? अनिल कपूरने 'उगाच रिस्क नको' म्हणत 'बाजीगर' नाकारला. सलमान खानने 'अशी व्यक्तिरेखा नको' म्हणत काही बदलही सुचवले आणि मग सलिम खानना वाटलं, सलमानने अशी भूमिका आत्ताच साकारणे घाई होईल म्हणून पिक्चरही नाकारला. शाहरुखशी अब्बास मुस्तानने संपर्क साधताच त्याने 'स्टोरी सिटींग' केली आणि थीम आवडताच 'कुछ हटके करते है' म्हणतच हे आव्हान स्वीकारत तो 'बाजीगर' झाला.

    नायकच निगेटिव्ह भूमिकेत आहे. आपल्या पित्याच्या (अनंत महादेवन) मृत्यूस आणि आईच्या (राखी) दुरवस्थेला जबाबदार असलेल्याच्या (दलिप ताहिल)  दोन्ही मुलींशी ‘प्रेमाचा खेळ’ करतो. एकीला (शिल्पा शेट्टी) लग्नाचे आमिष दाखवून इमारतीच्या गच्चीतून खाली ढकलतो. दुसरीशी (काजोल) तो प्रेमाचे नाटक करतोय. तो सुडाने पेटलाय… असा ‘नायक’ चित्रपट रसिकांना आवडेल?
    समजा चित्रपटाच्या शेवटी अशा क्रूरकर्मा नायकाचा मृत्यू दाखवला तर? की एका खूनप्रकरणी पोलीस त्याला पकडून नेतात असा क्लायमॅक्स ठेवला तर?
    अनुभवी राखीनेच हा प्रश्न उपस्थित करुन हा दुसरा शेवट असावा म्हटलं. वितरकही तेच म्हणत होते. दिग्दर्शक अब्बास मुस्तान यांनी ‘सेफ झोन’ म्हणून दोन्ही शेवट चित्रीत केले. प्रेक्षकांना पहिला शेवट रुचला नाही तर पटकन त्यात बदल करायचा याची तयारी ठेवली.
    रसिकांना मात्र ‘बाजीगर’ (रिलीज १२ नोव्हेंबर १९९३… चक्क तीस वर्ष झालीदेखील. म्हणूनच हा ‘फोकस’) चा पहिला शेवट आवडला. चक्क निगेटीव्ह भूमिका साकारलेला ‘हीरो’ आवडला. चक्क नायक प्रेयसीला गच्चीतून ढकलतो आणि खाली ती बेशुद्ध पडली असता, तिच्याभोवती पोलीस व पब्लिक असतानाही हा क्रूरकर्मा हीरो त्याकडे दुर्लक्ष करुन चालून जातो या दृश्याला पब्लिकचा भारीच रिस्पॉन्स मिळाला. याचं कारण, नव्वदच्या दशकात चित्रपट रसिकांना व्यावसायिक चित्रपटाची मोडलेली चौकट पहायची होती. या हीरोवर अन्याय झालाय म्हणून तो असा कठोर वागला हे त्यांना पटले होते. वर्षानुवर्ष रुपेरी पडद्यावर चिकटलेल्या नायक व खलनायकाच्या प्रतिमेत त्यांना आता बदल हवा होता. नायक म्हणजे असंख्य सदगुणाचा पुतळा आणि व्हीलन म्हणजे पापी, दुर्जन, दुष्ट हेतू असलेला हे फारच झाले होते. या चौकटीला मुकुल आनंद दिग्दर्शित ‘ऐतबार’ (राज बब्बर) आणि ‘अग्निपथ’ (अमिताभ बच्चन) यांनी नक्कीच धक्का दिला होता. आता त्यापुढे जायला हवे होते. ती गरज होतीच. यश चोप्रा दिग्दर्शित ‘डर’मध्येदेखिल सहनायक (शाहरुख खान) खलप्रवृतीचाच आहे. तो आपल्याला आवडलेल्या युवतीवर (जुही चावला) ती विवाहित असूनही ‘क… क… किरण… तुम मेरी हो किरण’ असं विकृतपणे म्हणत एकतर्फी प्रेम करतो. मला आठवतय, मुंबईतील मेट्रो थिएटरमध्ये पिक्चरच्या हीरो (सनी देओल) पेक्षा काहीशा विकृत अशा सहनायकाला हाऊसफुल्ल गर्दीचा रिस्पॉन्स मिळला. ‘बाजीगर’च्याच क्रेझमध्येच ‘डर’ आला (रिलीज २४ डिसेंबर १९९३) तोच फर्स्ट शोपासूनच सुपर हिट. ‘बाजीगर’च्या न्यू एक्सलसियरमधील प्रीमियरला सुभाष घईची खास उपस्थिती होती. मुंबईत मेन थिएटर ड्रीमलॅन्डला झळकताना पिक्चर इतकं हिट होईल असं वाटले नव्हते. शाहरुख खान या नावाभोवती अजून वलय वाढले नव्हते. तो व काजोल जोडीचा हा पहिलाच चित्रपट. शिल्पा शेट्टीचा पहिलाच चित्रपट (दिलीप नाईक दिग्दर्शित ‘गाता रहे मेरा दिल’ खरं तर तिचा पहिला चित्रपट. अंधेरीतील नटराज स्टुडिओत मुहूर्त झाल्याचे आठवतय. चार रिळांच्या शूटिंगनंतर पिक्चर डब्यात गेला.) तात्पर्य, ‘बाजीगर’ला स्टार व्ह्यॅल्यू नव्हती. ती पिक्चर हिट झाल्यावर येते. तसेच येथे झाले. गंमत माहित्येय का? एक जानेवारी १९९३ म्हणजे नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी याचे शूटिंग सुरु होईपर्यंत शाहरुख व काजोल एकमेकांना ओळखत नव्हते. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी शूटिंग करावे या मताचा शाहरुख होता तर शाहरुखचं रुपडं पाहून ‘याला कोणी हीरो केला’ यावर काजोल आपल्या मेकअपमनकडे अखंड बकबक करीत होती. शाहरुख या बडबडीला कंटाळला होता. खुद्द काजोलने एका मुलाखतीत ही गोष्ट रंगवून सांगितलीय.
    बाजीगर ओ बाजीगर, ऐ मेरे हमसफर, छुपाना भी नहीं आता, किताबे बहुत सी, ये काली काली आखे ही या पिक्चरची गाणी अगोदरच हिट झाल्याने (तो टेपरेकॉर्डर, ऑडिओ कॅसेटचा जमाना होता आणि ‘बाजीगर’ व्हीनस कॅसेट निर्मित चित्रपट. गाण्याचे महत्व ते जाणत.) पिक्चरची हवा होती. शाहरुखचा परफाॅम्स आवडताच पिक्चरचा रौप्य महोत्सवापर्यंतचा प्रवास सुखाचा झाला. यशासारखं महत्वाचे काहीच नसते म्हणा. चित्रपटात अनंत महादेवन, जाॅनी लिव्हर, दिनेश हिंगू, सिध्दार्थ रे, रेशम टिपणीस इत्यादींच्याही भूमिका आहेत. शाहरुख रेशमचा गळा दाबून खून करतो, या शूटिंगच्या आजही रेशम आठवणी सांगतेय. एक चित्रपट असे बरेच काही देतो. थीमवरुन हा विदेशी चित्रपटावर बेतलाय हे स्पष्ट आहेच. ‘ए किस बिफोर डाईंग’ (१९९१) यावरुन ‘बाजीगर’ आला तो राॅबिन भट्ट, आकाश खुराना व जावेद सिद्दीकी यांनी हिंदी चित्रपट शैलीत लिहिला.
    कोणी शाहरुखची तुलना राजकुमारशी, तर कोणी राज बब्बरशी केली. तर कोणी नाना पाटेकरशीही केली. ‘नकारात्मक व्यक्तिरेखा, पण शैली वेगळी’. पण शाहरुखचा अभिनय अगदी सुरुवातीच्या काळातील ‘ज्वार भाटा’, ‘जुगनू’, ‘मेला’, जोगन’, ‘दीदार” वगैरे चित्रपटातील दिलीपकुमारसारखा होता.
    ‘बाजीगर’साठी शाहरुख खानने फिल्म फेअर पुरस्कार पटकावला आणि त्याच आनंदात तो इव्हेन्टसच्या रात्री अब्बास मुस्तान यांच्या दक्षिण मुंबईतील गजबजलेल्या वस्तीतील घरी गेला तेव्हा पहाटेचे चार वाजले होते. सोबत अन्नू मलिक वगैरे होते. ‘बाजीगर’चे महत्व त्याने जाणले म्हणायचं. हा किस्सा फार गाजला.
    अशा ‘व्हीलन हीरो’ने आदित्य चोप्रा दिग्दर्शित ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ (१९९५) पासून कात टाकली आणि एक नवीन पर्व जणू सुरु झाले. ते आजही सुरु आहे. ‘बाजीगर’ एक जणू ॲसिड टेस्ट होता म्हणायचे का? अनिल कपूरने ‘उगाच रिस्क नको’ म्हणत ‘बाजीगर’ नाकारला. सलमान खानने ‘अशी व्यक्तिरेखा नको’ म्हणत काही बदलही सुचवले आणि मग सलिम खानना वाटलं, सलमानने अशी भूमिका आत्ताच साकारणे घाई होईल म्हणून पिक्चरही नाकारला. शाहरुखशी अब्बास मुस्तानने संपर्क साधताच त्याने ‘स्टोरी सिटींग’ केली आणि थीम आवडताच ‘कुछ हटके करते है’ म्हणतच हे आव्हान स्वीकारत तो ‘बाजीगर’ झाला. युवा पिढीला असाच ‘चॅलेंज’ स्वीकारणारा हीरो हवा होताच… हार कर जीतने वालों को ‘बाजीगर’ कहते है हे तेव्हापासून कायमचेच हिट झालंय.- दिलीप ठाकूर