खेळीयाड : ४८ हजार कोटींचा ‘जॅकपॉट’

जगातील सर्वाधिक लोकप्रिय क्रिकेट लीग म्हणजे आयपीएल. या स्पर्धेच्या प्रसारण हक्कांनी आजवरचे भारतातले सर्व विक्रम मोडलेत. तब्बल ४८ हजार ३८० कोटींना टीव्ही आणि इंटरनेट प्रसारणाचे हक्क विकले गेलेत. आधीच श्रीमंत असलेल्या बीसीसीआयची तिजोरी यामुळे ओसंडून वाहणार आहे. या पैशांचा भारतीय क्रिकेटसह अन्य खेळांच्या विकासाला हातभार लागावा, अशी सर्वसाधारण क्रीडाप्रेमींची भावना आहे.

  • एवढ्या पैशांचं काय करणार?

नुकत्याच संपलेल्या आयपीएलमध्ये गुजरात टायटन्स या नवोदित संघानं जबरदस्त कामगिरी करत विजेतेपद पटकावलं. मात्र, त्यानंतर दोनच आठवड्यांनी मुंबईत प्रसारण हक्कांचा लिलाव सलग तीन दिवस चालला. अखेरच्या दिवशी बीसीसीआयचे अध्यक्ष जय शाह यांनी जाहीर केलेल्या निकालामुळे भारतीयांचे डोळे अक्षरशः पांढरे झाले. २०२२ ते २०२७ या पाच वर्षांसाठी टीव्ही प्रसारणाचे हक्क डिझ्ने स्टारकडे कायम राहिलेत.

मात्र, त्यासाठी २३ हजार ५७५ कोटी रुपये मोजण्याची तयारी दाखवल्यानंतर. इंटरनेट प्रसारणाचे हक्क मात्र आता स्टारकडे नसतील. कारण व्हायकॉम १८ या मुकेश अंबानींच्या रिलायन्स समुहातील कंपनीनं स्टारला धोबीपछाड दिला आहे. एकूण २० हजार ५०० कोटी रुपये मोजून व्हायकॉम १८नं हे हक्क विकत घेतलेत. त्यामुळे आयपीएलनं एक नवा विक्रम आपल्या नावावर केलाय.

वर्ल्ड नंबर टू

दर सामन्यामागे प्रसारण हक्कांच्या निकषावर आता आयपीएल जगात दुसऱ्या स्थानी जाऊन पोहोचलीये. पुढल्या पाच वर्षांमध्ये एकूण ४१० सामने खेळवले जाणार आहेत. त्याचा विचार केला तर प्रत्येक सामन्यामागे बीसीसीआयला तब्बल १०७.५ कोटी रुपये मिळणार आहेत. केवळ अमेरिकेतील फुटबॉल लिग एनएफएल याच्या पुढे आहे.

एनएफएलला प्रसारण हक्कांमधून सामन्यामागे १३६ कोटी रुपयांची कमाई होते. आयपीएलनं प्रिमियर लिग (इपीएल, इंग्लंडमधील फुटबॉल लिग), मेजर लिग बेसबॉल आणि जर्मन फुटबॉल लिग बुंडेस्लिंगा या स्थानिक स्पर्धांना मागे टाकलंय. अर्थातच हा जागतिक विक्रम करताना आयपीएलनं स्वतःचाच देशांतर्गत विक्रम मोडलाय, हे वेगळं सांगायला नको.

प्रसारणाची रक्कम झाली तिप्पट

आयपीएल २००८ मध्ये सुरू झाली त्यावेळी १० वर्षांसाठी प्रसारणाचे हक्क विकले गेले ते ८ हजार २०० कोटींना…. तेव्हादेखील ही रक्कम प्रचंड वाटली होती. त्यानंतर पुढल्या पाच वर्षांसाठी, म्हणजे २०१८ ते २०२२ या काळासाठी टीव्ही आणि इंटरनेट अशा दोन्ही प्रसारणांचे हक्क स्टारनं घेतले.

त्यावेळी त्यांनी पाच वर्षांसाठी १६ हजार ३४७ कोटी रुपये मोजले होते. मात्र, अवघ्या पाच वर्षांत ही रक्कम तिप्पट झाली आहे. आयपीएलची प्रचंड लोकप्रियता, मोबाईल-टॅब किंवा टीव्हीवर फायरस्टिकद्वारे सामने पाहण्याचं वाढलेलं प्रमाण ही यामागची कारणं आहेत.

५ वर्षांपूर्वी इंटरनेट हक्कांना फारसं महत्त्व नव्हतं. मात्र आता जवळजवळ टीव्हीवरील हक्कांइतकंच मूल्य इंटरनेटलाही लागलंय. कदाचित आणखी ५ वर्षांनी टीव्हीचं महत्त्व आणखी कमी झालेलं बघायला मिळू शकतं. आता तुमच्या-आमच्यासारख्या सामान्य माणसाच्या मनात प्रश्न निर्माण होतो की बीसीसीआय या पैशांचं करणार काय?

क्रिकेटला किती फायदा ?

आयपीएल सुरू झाल्यापासूनच जगातली पहिल्या क्रमांकाची क्रिकेट लिग ठरली. अगदी ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅशपेक्षाही पैसा, प्रसिद्धीमध्ये आयपीएल सरस आहे. ही स्पर्धा सुरू झाल्यानंतर खऱ्या अर्थानं भारतीय क्रिकेटमध्ये पैशाचा ओघ सुरू झाला. त्यानंतर भारतीय क्रिकेटला चांगले दिवस आले आणि आता क्रिकेट विश्वात भारताची अक्षरशः दादागिरी आहे.

बीसीसीआयला मिळणारा हा निधी अर्थातच क्रिकेटच्या आणखी वाढीसाठी वापरला जावा, ही रास्त अपेक्षा आहे. गावागावात क्रिकेटचे संघ आहेत. गल्लीबोळात स्पर्धा भरतात. तिथून अधिक टॅलेंटेड खेळाडू शोधले गेले पाहिजेत. त्यासाठी एखादी ज्युनिअर लिग सुरू करायलाही हरकत नाही.

दुसरा मुद्दा आहे तो महिला क्रिकेटचा. महिला क्रिकेटमध्ये फारसा पैसा-प्रसिद्धी नसल्यामुळे तिकडे नाही म्हटलं तरी दुर्लक्षच होतं. आगामी काळात महिलांची फूल-फ्लेज आयपीएल सुरू होणार आहे. त्यातून महिला क्रिकेटचाही विस्तार होऊ शकतो. शिवाय बीसीसीआयनं अन्य खेळांकडेही लक्ष दिलं तर त्याचा फायदा होईल.

‘खिलाडू’ वृत्तीची गरज

जेव्हा एखादा खेळाडू ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकतो तेव्हा बीसीसीआयकडून त्याला मोठ्या रकमेचं बक्षीस जाहीर केलं जातं. ही अर्थातच स्वागतार्ह गोष्ट असली तरी पुरेशी नाही. अन्य खेळांच्या विकासासाठी केंद्र सरकार आणि विविध राज्य सरकारनं आपापल्या परीनं प्रयत्न करत असतात. मात्र, बाबूगिरी आडवी येते आणि भारताचा एखादं गोल्ड, २-३ सिल्व्हर यावर समाधान मानावं लागतं. हे चित्र बदलण्याची आर्थिक आणि मानसिक क्षमता बीसीसीआयसारख्या क्रीडा संघटनांमध्ये आहे. त्यासाठी खिलाडूवृत्ती दाखवून अन्य खेळांना सढळ हस्ते मदत केली तर त्याचा फायदा होऊ शकतो.

येत्या काळात आयपीएलच्या प्रसिद्धीची हवा वाढते, कमी होते की, तेवढीच राहते हे आताच सांगता येणं कठीण आहे. मात्र आर्थिक बाबतीत बीसीसीआय अधिकाधिक श्रीमंत होत चालली आहे, हे खरं… आता सामन्यामागे प्रसारण हक्कांच्या बाबतीत केवळ अमेरिकेतील फुटबॉल लिग आयपीएलच्या पुढे आहे. आगामी काळात एनएफएललाही भारतीय लिगनं मागे टाकलं तर आश्चर्य वाटणार नाही. पण वर म्हटल्याप्रमाणे याचा फायदा क्रिकेट आणि अन्य खेळांच्या वाढीसाठी झाला पाहिजे. तरच या ४८ हजार कोटींच्या ‘जॅकपॉट’चा देशालाही फायदा झाला, असं म्हणता येईल.

sportswriterap@gmail.com