कावळोबांची जलसफारी

  बराच वेळ झाला तरी अलेक्झांडरने आपल्याजवळ येऊन लाडीगोडी केली नाही, हे आईच्या लक्षात आलं. स्वारीचं काय चाललय, हे बघण्यासाठी तिने तेजोमयीस सांगितलं. ती या खोलीतून त्या खोलित जात, अलेक्झांडरचं काय चाललय हे बघू लागली. गॅलरीच्या खिडकीतून अलेक्झांडर बाहेर एकटक बघत असल्याचं तिला दिसलं.

  गॅलरीच्या समोरच स्वच्छ पाण्याचा एक नाला वाहतो. आजूबाजूला दाड झाडी आहे. वेगवेगळी झाडं आहेत. त्या झाडांवर विविध पक्षी येऊन किलबिलाट करतात. त्यांना न्याहळण्याचा अलेक्झांडरला छंद जडला होता. नवीन पक्षी दिसला की त्याची उत्सुकता वाढायची. मग तो आई-बाबा किंवा तेजोमयीस ओढत, तिकडे नेऊन नवा पक्षी दाखवायचा.

  आज याला काहीतरी नवं दिसल्याचं तेजोमयीच्या लक्षात आलं. अलेक्झांडरच्या या निरीक्षणात व्यत्यय न आणता ती बाहेर बघू लागली. तिने बऱ्याच झाडांवर नजर फिरवली पण एकही नवा पक्षी तिला दिसला नाही. याचं आपलं काहीतरी वेगळंच असतं, असं मनात म्हणत ती माघारी फिरणार तोच तिचं लक्षं नाल्याकडे गेलं नि थक्क झाली. ती लगेच आत धावली. आईबाबांना बोलावलं. समोरचं दृष्य बघून त्यांनाही आश्चर्य वाटलं.

  नाल्यातील एका कचऱ्याच्या बॉक्सवर बसून एक कावळोबा मजेत पुढे पुढे जात होते. असं आपोआप काहीही न करता, घडत असलेल्या जलसफारीचा त्यांना खूपच आनंद झाला असावा. कारण ते इकडेतिकडे जरासुध्दा न बघता, मस्त मजेत ध्यान लावून छान बसले होते.

  कोणताही कावळा एके ठिकाणी स्वस्थ बसत नाही. सारखं इकडून तिकडं त्यांचं उडणं सुरु असत. त्यामुळे या कावळोबास हा जलप्रवास जाम आवडल्याचं सिध्द होत होतं.

  काय हो बाबा, हा चमत्कारच नाही का? तेजोमयीने विचारलं.
  कसला चमत्कार गं? आई म्हणाली.
  अगं, आपण आतापर्यंत आपल्या नाल्यातून फक्त बगळोबांचीच सफर बघयचो ना. इतके पक्षी इथे येतात पण कुणीही अशी जलसफारी केल्याचं आपण बघितलं नाही.
  अय्या! खरच की, माझ्याबाई हे लक्षातच आलं नाही. आई आश्चर्याने म्हणाली.
  पण तुमच्या लाडकोबाच्या लक्षात आलय ना ते… बाबा अलेक्झांडरला कुरवाळत म्हणाले.

  झाडांवरचे इतर पक्षी कावळोबाकडे मोठ्या उत्सुकतेनं बघत होते. पण कुणालाही कावळोबासारखी जलसफर करायची इच्छा झाली नाही.
  बाबा, इतर पक्षांना कां बरं हा आनंद घ्यावा वाटत नाही हो?

  अगं, भीती दुसरं काय? आपण मागे एकदा झाडावरचे पक्षी बगळोबाच्या जलसफारीकडे कसे एकटक बघत असल्याचं बघितलं नव्हतं का? पण कुणालाही पाण्यावर तरंगण्याची मजा घ्यावी असं वाटलं नाही.
  मग आता हे कावळोबा? तेजोमयीनं विचारलं.

  बाळ, पक्षीसुध्दा हुषार असतात. या कावळोबाने बराच विचार केलेला दिसतोय. मुख्य म्हणजे त्याने त्याच्या मनातील भीती काढून टाकली असावी. म्हणूनच त्याला हे साहस करता आलं. ही भीती किती फुकाची असल्याची लक्षात आल्यानं तो बघ, कसा मजेमजेत या जलसफारीचा आनंद घेतोय. बाबा म्हणाले.

  यातून आपणसुध्दा एक धडा घेऊ शकतो ठमाबाई, आई म्हणाली
  कोणता गं?

  अगं, उगाचच कशाचीही भीती बाळगायची गरज नसते. अशी भीती बाळगली तर नव्या नव्या गोष्टी शिकता येत नाही की करता येत नाही. त्यांचा आनंदही घेता येत नाही.

  अगदी बरोबर, बाबा जोरात म्हणाले. अलेक्झांडरने त्यांच्याकडे चमकून पाहिले..

  म्हणजे मीसुध्दा या जलसफरीचा आनंद घेतला तर चालेल का? असे भाव त्याच्या डोळयात उमटले.

  कां नाही, कां नाही? तुझ्यासोबत आम्हीसुध्दा घेऊ की वाटर किंगडममधील जलसफारीचा आनंद! अलेक्झांडरच्या डोळयातील आणि चेहऱ्यावरील भाव बरोबर ओळखत आई म्हणाली.

  आईचं बोलणं स्वारीला बरोबर कळत असल्याने त्याने आईला आनंदाने मिठी मारली. दरम्यान जलसफारीचा आनंद उपभोगून कावळोबा झाडावर जाऊन बसले होते…

  – सुरेश वांदिले